पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धनगर समाजाला अनुसूचीत जमाती(एस. टी.) प्रवर्गात समाविष्ट करण्यात येवु नये, खडकदेवळा येथील तरुणाच्या रहस्यमय मृत्यूची चौकशी होवुन संबंधितांना तात्काळ अटक करण्यात यावी यासह आदिवासी समाजाला उद्भवणाऱ्या समस्यांबाबत एकलव्य आदिवासी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुधाकर वाघ यांच्या नेतृत्वाखाली तसेच जळगाव लोकसभा जिल्हा अध्यक्ष एकनाथ अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत १ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता पाचोरा शहरातील महाराणा प्रताप चौकापासून ते प्रांताधिकारी कार्यालया पर्यंत एकलव्य आदिवासी संघटनेचा भव्य असा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सदरचा मोर्चा महाराणा प्रताप चौक, छत्रपती राजे संभाजी महाराज चौक, रेल्वे भुयारी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांताधिकारी कार्यालया पर्यंत काढण्यात आला. मोर्चा दरम्यान उपस्थित समाज बांधवांनी राज्य सरकारच्या व स्थानिक आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
राज्य सरकार हे अनुसूचीत जमाती (एस. टी.) प्रवर्गातुन धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असुन याबाबत हालचालीना वेग आला आहे. हा निर्णय आदिवासी समाजाला देशोधडीला लावणारा असुन राज्य सरकारने तात्काळ निर्णय मागे घ्यावा, तालुक्यातील खडकदेवळा येथील योगेश शिवाजी भिल या तरुणाचा शेत शिवारात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असुन या प्रकरणातील संबंधित व्यक्तींना तात्काळ अटक करण्यात यावी यासोबतच आदिवासी समाजाला उद्भवणाऱ्या विविध समस्यांबाबत एकलव्य आदिवासी संघटना आक्रमक होवुन शहरातुन जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या जन आक्रोश मोर्चात समाज बांधव, भगिनी, तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.