जामनेर प्रतिनिधी । 8 मार्च ते 22 मार्च जामनेर तालुक्यात पोषण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून नांद्रा प्र.लो. अंगणवाडी सायकल रॅली काढून जनजागृती अभियान राबविण्यात आले. बचतगटांना स्वच्छतेविषयी महत्त्व सांगून आहाराविषयी माहिती देण्यात आली तसेच अन्नसुरक्षा अन्नभेसळ इत्यादीबाबत प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. किशोरवयीन मुलींना अनिमिया ओळखणे, आहारातून अनिमिया दूर करणे, स्वच्छता बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
परसबाग करून आपल्याला लागणार भाजीपाला हा नैसगिर्क रित्या रासायनिक खतांचा वापर न कारता कसा मिळवावा. तसेच शेतकऱ्यांनी सुद्धा रासायनिक शेती पेक्षा नैसगिर्क शेती कशी करावी व नैसर्गिक शेतीचे महत्त्व यावेळी गावकऱ्यांना सांगितले. कुंभारी सिम येथे ताईने किशोरवयीन मुलींची अनोख्या पद्धतीने सभा घेऊन त्यात त्यांना नाव न लिहीता त्यांच्या मनातील अशी समस्या जी त्या कुणालाही सांगू शकत नाहीत ती लिहिण्यास सांगितले. वाचन करून त्यावर चर्चेतून तोडगा शोधण्याचा प्रयत्न केला.
काही समस्या चर्चेतून सुटतील तर काही सूटणार नाही तरीही पण मुलींना मिळालेली ही मोकळीक व हा मंच त्यांची घुसमट व कोंडी फोडण्यास खूप कामात आला. यात गावातील टवाळखोर मुलांनी केलेल्या छेडखानी पासून मासिक पाळीतील समस्यांपर्यंत अनेक प्रश्न होते व त्यावर चर्चा झाली. यावेळी डॉ.आधार पाटील, नीता गांगुर्डे, अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्चना धामोरे, सेविका अनिता पाटील, मीना पाटील, सुनिता घोरपडे या आणि गावातील मान्यवर उपस्थित होते. बालविकास प्रकल्प अधिकारी ईश्वर गोयर व पी.एम.परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली सदर सप्ताह राबवला जात आहे.