अंधश्रद्धा निर्मूलन प्रकल्पांतर्गत “मअंनिस”तर्फे जनजागृती

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा जळगाव आणि रायसोनी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन विभागांतर्गत विद्यार्थ्यांनी समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन करणे हा प्रकल्प घेऊन धरणगाव तालुक्यात जनजागृती केली. यात धारशेरी येथील विद्यालयात विविध चमत्कार सादरीकरण करुन वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांना सांगण्यात आला.

चमत्कारातून विज्ञान या विषयावर दिगंबर कट्यारे, राज्य कार्यवाह, वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प विभाग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर रायसोनी महाविद्यालयाच्या अक्षयकुमार धुगे, लखीचंद मुंगड, गोविंदा कहाने, आकाश नेवासकर आणि अमन परदेशी या विद्यार्थ्यांनी सदर प्रकल्प विभागामार्फत सहभाग घेऊन आयोजन केले. त्या अंतर्गत माध्यमिक विद्यालय, धारशेरी ता.धरणगाव या विद्यालयात चमत्कार सादरीकरण झाले.

त्यात प्रा. कट्यारे यांनी, पाण्याने भरलेला दिवा पेटविणे, जिभेतून सुई आरपार काढणे, हातातून रक्त काढणे, दोरीच्या गाठी गायब करणे, कलशातून अखंडपणे पाणी काढणे, मंत्राने यज्ञ पेटविणे असे विविध चमत्कार सादरीकरण करुन वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कार्यकारणभाव तपासणे ही संकल्पना स्पष्ट केली. आपल्या समस्या आपणच सोडवू शकतो, बाबा-बुवा यांच्याकडे जाऊन आपले शोषणच होते असेही प्रा. कट्यारे यांनी ठासून सांगितले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन संकल्पना समजून घेतली. अनेक विद्यार्थ्यांनी चमत्कार प्रात्यक्षिके सादर केली, हे उपक्रमाचे वैशिष्ट्य होते. कार्यक्रमाचे प्रस्तावना आणि सूत्रसंचालन मुख्याध्यापक मयुर पाटील यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.

Protected Content