अमळनेर –लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिक्षण क्षेत्रात केवळ ज्ञान देणे नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपणेही तेवढेच महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अमळनेरमधील PTA क्लासेस संघटनेने सिद्ध केले आहे. समाजातील सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 30 गरजू विद्यार्थ्यांना या संस्थेने दत्तक घेण्याचा निर्णय घेतला असून, हे फक्त शिक्षणाचे दान नसून माणुसकीचे प्रतीक ठरत आहे.
PTA क्लासेसने दत्तक घेतलेल्या या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण पित्याच्या छत्रछायेशिवाय मोठे होत आहेत, तर काहींच्या घरी दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत आहे. अशा कठीण परिस्थितीतही त्यांच्या शिक्षणाचा दिवा विझू नये म्हणून PTA चे समर्पित शिक्षक पुढे सरसावले आहेत. या मुलांना संपूर्ण वर्षभर नि:शुल्क शिकवणी, पाठ्यपुस्तके, वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्य पुरविले जाणार आहे.

या उपक्रमाची औपचारिक घोषणा अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांच्या कार्यालयात करण्यात आली. PTA चे अध्यक्ष भैय्यासाहेब मगर यांनी याबाबत माहिती दिली. दरवर्षी PTA क्लासेसमार्फत सुमारे 400 हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन फीमध्ये सवलत दिली जाते, हे विशेष उल्लेखनीय आहे.
उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी PTA क्लासेसच्या या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “अशा समाजोपयोगी उपक्रमांना शासनस्तरावरून प्रोत्साहन मिळावे, ही काळाची गरज आहे.” समाजासाठी कार्य करणाऱ्या अशा शैक्षणिक संस्थांचा आदर्श इतरांनीही घ्यावा, अशी त्यांनी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या वेळी PTA संघटनेचे अनेक सदस्य उपस्थित होते. यामध्ये अध्यक्ष भैय्यासाहेब मगर, किरण माळी, राकेश बडगुजर, सुरश्री वैद्य, सुधीर टाकणे, सोनल जोशी, वैशाली निकम, शिरीष डहाळे, शेखर कुलकर्णी, हर्षल बडगुजर, आरिफ पिंजारी, ज्ञानेश्वर मराठे, स्वर्णदिप राजपूत आणि इतर समर्पित शिक्षक यांचा समावेश होता. हे सर्व शिक्षक दरवर्षी समाजासाठी असे उपक्रम सातत्याने राबवत असतात.
PTA क्लासेस संघटनेने दाखवलेले हे उदाहरण समाजात शिक्षण हे केवळ एक व्यवसाय नसून, एक पवित्र सामाजिक प्रक्रिया असल्याचे पुन्हा अधोरेखित करते. अशा कार्यामुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि भविष्यातील पिढीला योग्य दिशा मिळते.



