भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ विधानसभेची जागा पीआरपीला सोडावी अन्यथा, आघाडीच्या लोकसभा उमेदवाराचा प्रचार न करण्याचा इशारा आज जगन सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
आज पीआरपीचे महामंत्री जगन सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका सादर केली. ते म्हणाले की, येत्या २०१९ मध्ये होणार्या विधानसभेच्या निवडणुकीत भुसावळची जागा पीआरपीला सोडून लेखी आश्वासन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने द्यावे अन्यथा लोकसभेच्या निवडणूकीत काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी उमेदवाराच्या जळगाव आणि रावेर येथे होणार्या प्रचार सभेत व्यासपीठावरसुद्धा चढणार नाही आणि प्रचारही करणार नाही अशी ठाम भूमिका पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी घेतली आहे. लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आमची भूमिका ठाम असणार आहे. रविवारी पीआरपीच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पदाधिकार्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी दिली.
जगन सोनवणे पुढे म्हणाले की, गत काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून संस्थापक अध्यक्ष शरद पवार, अजीत पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या सोबत ग्रामपंचायत ते लोकसभेच्या प्रत्येक निवडणूकीत पीआरपी सोबत राहिली आहे. मात्र, जिल्ह्यात गतकाळात विधानसभा असो की लोकसभा या निवडणूकीत प्रभावी भाषण आणि सभा गाजवण्यासाठी पीआरपीचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणेंची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना येते. परंतु मागील पाच वर्षात जिल्ह्यात कष्टकरी, मुस्लीम,दलित व बहुजन समाजबांधवांवर होणार्या अन्यायाला पीआरपीने विविध आंदोलनाच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. रविवार रोजी पीआरपीच्या संपर्क कार्यालयात जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्या बैठकीत कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार भुसावळ विधानसभेची जागा ही पीआरपीला सोडण्यात यावी अशी आमची ठाम भूमिका आहे. अन्यथा लोकसभेत जळगाव आणि रावेर येथील राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत आणि व्यासपीठावर आम्ही दिसणार नाही असेही सोनवणे यांनी सांगितले. दरम्यान, पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्याशी बोलून आम्ही हा निर्णय घेतल्याचेही सोनवणे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला पीआरपी युवा जिल्हाप्रमुख राकेश बग्गन,ग्रामीण जिल्हाप्रमुख संतोष मेश्राम, राष्ट्रीय मजदूर सेना जिल्हाप्रमुख राजू डोंगरदिवे,मुस्लीम धर्मगुरु मौलाना हरीश सुरवाडे, माई ब्रिगेड जिल्हाप्रमुख संगीता ब्राह्मणे आदी उपस्थित होते.