जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्नवसीत असलेले उचंदे गावात शासनाकडून मूलभूत सुविधा नसल्याने गावातील ग्रामस्थ समाधान भोलाणे यांच्यासह इतर ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेपासून अन्नत्याग आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनाला या मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे गाव हे पुनर्वसन करून बसविण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या ४० वर्षांपासून या गावात गटारी नाही, शिवाय रस्ते देखील नसल्याने गटारीतील सांडपाणी हे रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उचंदे गाव पुनर्वसन करण्यापूर्वी शासनाकडून वेळोवेळी फक्त आश्वासन देण्यात येत आहे, परंतु अद्यापपर्यंत गावात कुठलीही मुलभूत सुविधा उपलब्ध झालेली नाही. गावातील मूलभूत सुविधा देण्याच्या मागणीसाठी यापूर्वी गावातील ग्रामस्थ व तक्रारदार समाधान भोलाणे यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते, तरीदेखील या अर्जाचा कुठलाही विचार झालेला नसल्या कारणामुळे अखेर गावातील ग्रामस्थ व तक्रारदार समाधान भोलाणे यांनी स्वातंत्र्यदिनी मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता शासनाचे लक्ष वेधवे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही, असा देखील पवित्र तक्रारदार समाधान भोलाणे यांनी घेतला होता.