Home Cities पारोळा वन्यप्राण्यांपासून शेतीचे रक्षणासाठी जाळी न बसवल्यास आंदोलनाचा इशारा

वन्यप्राण्यांपासून शेतीचे रक्षणासाठी जाळी न बसवल्यास आंदोलनाचा इशारा


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पश्चिम खानदेशातील पारोळा परिसरातील शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी ठोस पावले न उचलल्यास धुळे-जळगाव नॅशनल हायवे बंद करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांपासून निलगाय, रानडुक्कर, हरिण यांसारख्या वन्य प्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यामुळे त्यांची उपजीविका धोक्यात आली असून शासनाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.

विचखेडे, मोंढाळे व महाळपूर या ग्रामपंचायतींनी यासंदर्भात संयुक्त ठराव पारित केला आहे. या ठरावात, शेतकऱ्यांच्या जमिनी व वन विभागाच्या हद्दीवर संरक्षण जाळी (फेन्सिंग) तात्काळ बसवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी वन विभाग, कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे अधिकृतपणे पोचविण्यात आली आहे. यासाठी शासनाने योजनांतर्गत निधी मंजूर करावा, अशीही विनंती करण्यात आली आहे.

ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, जर पुढील पंधरा दिवसांत कोणतीही कृती झाली नाही, तर शेतकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरतील आणि धुळे-जळगाव राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात येईल. याचे सर्वस्वी उत्तरदायित्व प्रशासनाचे असेल, असा इशाराही देण्यात आला आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान वन्यप्राण्यांमुळे होत असून, सरकारच्या दुर्लक्षामुळे संताप वाढत आहे.

या मागणीसंदर्भात गावपातळीवर बैठकाही घेण्यात आल्या असून, संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. संरक्षण जाळी बसविण्याची मागणी काही वर्षांपासून होत असली तरी, अद्याप त्यावर ठोस निर्णय झालेला नाही. यामुळे शेतकरी अधिक आक्रमक होत आहेत.


Protected Content

Play sound