वॉशिंग्टन वृत्तसंस्था । दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठींबा दर्शविण्यासाठी अमेरिकेत निदर्शने करण्यात आली असून यात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
वॉशिंग्टनमधील भारतीय दुतावासाच्या बाहेर खलीस्तानी समर्थकांनी निदर्शने केली. मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात अमेरिकेत शनिवारी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी खलिस्तानी समर्थकांकडून राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. यावेळी खलिस्तानचे झेंडेही फडकण्यात आले. या आंदोलकांकडून बापूंच्या पुतळ्याच्या चेहर्यावर खलिस्तानचा झेंडा गुंडाळण्यात आला.
भारताकडून या सार्या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे. भारतीय दूतावासाकडून अमेरिकी सुरक्षा यंत्रणांकडे यासंदर्भात तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. अमेरिकी यंत्रणांनी तातडीने हालचाली करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी भारतीय दूतावासाकडून करण्यात आली आहे.