भुसावळ, प्रतिनिधी | नागरिकत्व नागरिकत्व कायदा व जामिया विद्यापीठामध्ये झालेल्या मारहाणीचा येथील शहर काँग्रेस कमेटीतर्फे आज (दि.१७) प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे जाहीर निषेध करण्यात आला.
या निवेदनात म्हटले आहे की, नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुधात लोकशाही मार्गाने विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठी चार्ज करणाऱ्या पोलीस व भाजपा सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. देशामध्ये युवकांना रोजगार उपलब्ध होत नाही. शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या असतांना देशाने आर्थिक पातळीवर निच्यांक गाठला असतांना एन.आर.सी. व कॅब असे कायदे करुन भारतीय संविधानाला गाल बोट लावण्याचे प्रयत्न मोदी सरकार करीत आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष श्रीमती सोनीया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसी देशाची एकता व अखंडता कायम राहण्यासाठी व भारतीय संविधान अबाधीत राहण्यासाठी देशभर लोकशाही मार्गाने प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा निषेध करण्यात आला आहे. या निवेदनावर माजी नगराध्यक्ष रवींद्र निकम यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.