Home Cities जळगाव रिपाइंचे जिल्हाधिकारी यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन व निदर्शने !

रिपाइंचे जिल्हाधिकारी यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन व निदर्शने !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील एका ९० वर्षीय वृद्ध महिलेची जमीन साखर कारखाना उभारणीच्या नावाखाली कवडीमोल भावाने खरेदी करण्यात आल्याचा आरोप करत, ती जमीन मूळ मालकिणीला परत मिळावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ)च्या वतीने आज, सोमवार ८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार ठिय्या आंदोलन व निदर्शने करण्यात आली.

महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली दुपारी ३ वाजता हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडत तत्कालीन महसूल मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

हे प्रकरण असे आहे !!
भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील रहिवासी असलेल्या चमेलीबाई तुकाराम तायडे (वय ९०) यांच्या नावे असलेली ४.५ एकर जमीन तत्कालीन मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी सन २००० च्या सुमारास खरेदी केली होती. ही जमीन तापी पूर्णा सहकारी साखर कारखाना उभारणीच्या उद्देशाने खरेदी करण्यात आली होती. मात्र, खरेदी होऊन अनेक वर्षे उलटले तरी अद्यापपर्यंत या जागेवर कोणताही साखर कारखाना उभारण्यात आलेला नाही.

यामुळे ज्या कारणासाठी जमीन प्रशासकीय स्तरावर खरेदी करण्यात आली, तो उद्देश सफल झाला नसल्याने ही जमीन पुन्हा वृद्ध महिला चमेलीबाई तायडे यांना परत करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने लावून धरली आहे. ठिय्या आंदोलनानंतर मागणी रिपाइं कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी दालनाच्या बाहेर घोषणाबाजी करून निदर्शने केली. ‘कारखाना नाही, तर जमीन कशासाठी?’, ‘पिडीत वृद्ध महिलेला न्याय द्या!’, अशा घोषणा देत प्रशासनाने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून चमेलीबाई तायडे यांना त्यांची जमीन परत मिळवून द्यावी, अशी मागणी अनिल अडकमोल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.


Protected Content

Play sound