Home Cities जळगाव बँड कलावंत ते आंतरराष्ट्रीय चित्रकार: राजू बाविस्कर यांच्या आत्मकथनाला साहित्य अकादमी पुरस्कार

बँड कलावंत ते आंतरराष्ट्रीय चित्रकार: राजू बाविस्कर यांच्या आत्मकथनाला साहित्य अकादमी पुरस्कार


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  खानदेशातील ग्रामीण जीवन, संघर्ष आणि कलेच्या माध्यमातून उभा राहिलेला स्वाभिमान यांचे प्रभावी चित्रण करणाऱ्या चित्रकार राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्या निळ्या रेषा’ या आत्मकथनाला 2025 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. एका संवेदनशील कलाकाराच्या जीवनप्रवासातून उलगडणारे हे आत्मकथन मराठी साहित्यविश्वात विशेष चर्चेत आले असून या सन्मानामुळे खानदेशातील साहित्य आणि कला क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राजू बाविस्कर हे केवळ उत्कृष्ट चित्रकार नाहीत, तर अत्यंत संवेदनशील आणि मानवतावादी व्यक्तिमत्व म्हणूनही ओळखले जातात. आपल्या संघर्षमय आयुष्याचा अनुभव त्यांनी शब्दांमध्ये मांडला आणि त्यातून ‘काळ्या निळ्या रेषा’ हे प्रभावी आत्मकथन आकाराला आले. 2022 मध्ये राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक मराठी आत्मकथन परंपरेत वेगळे स्थान मिळवणारे ठरले आहे. खानदेशातील ग्रामीण वास्तव, गरिबी, जातीय अन्याय आणि कलेच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या स्वाभिमानाचे प्रभावी चित्र या पुस्तकात रेखाटले आहे.

जगाने मागास म्हणून ओळखल्या गेलेल्या मातंग समाजात जन्मलेल्या बाविस्करांनी आपल्या आयुष्यातील संघर्षांवर मात करत कलेच्या बळावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. जळगाव जिल्ह्यातील एका संगीतिक कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बँडमध्ये ट्रम्पेट वाजवत असत. बालपणी ‘भूऱ्या’ या टोपणनावाने ओळखले जाणारे बाविस्कर सुरुवातीला बँड कलावंत म्हणूनच वाढले. लहानपणी शिक्षण सोडण्याची वेळ आली असतानाही प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या प्रभावामुळे त्यांनी पुन्हा शिक्षणाकडे वळण्याचा निर्णय घेतला.

गरिबी, कुटुंबातील संघर्ष, गहाणवट ठेवण्याची वेळ, बँड विकत घेण्याची धडपड अशा अनेक कठीण प्रसंगांमधून त्यांचा जीवनप्रवास पुढे सरकत राहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी शिक्षण घेतले. क्लॅरिनेट वाजवणे शिकले, स्वतःचा स्पिकर बँड उभारला आणि या सगळ्या प्रवासासोबतच चित्रकलेतही आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या चित्रांचा दिल्लीतील ललितकला अकादमीच्या ६५व्या प्रदर्शनात समावेश झाला होता. आज ते कला शिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत.

‘काळ्या निळ्या रेषा’ या आत्मकथनात ग्रामीण जीवनाचे वास्तव, कला आणि सामाजिक संघर्ष यांचा प्रभावी संगम दिसून येतो. सातपुडा डोंगररांगा, माती कोरण्यात गेलेले बालपण, पावसाच्या साक्षीने चाललेली गरिबीशी झुंज, स्त्रियांच्या जीवनातील वेदना, जातीय अन्याय आणि ग्रामीण भागातील निरक्षरता व बेरोजगारीचे वास्तव बाविस्करांनी अत्यंत जिवंत शब्दांत मांडले आहे. त्यामुळे वाचकाला गावकुसाबाहेरच्या जगाचे जिवंत चित्र डोळ्यासमोर उभे राहते.

या आत्मकथनातील भाषा साधी, सुबोध आणि अत्यंत संवेदनशील आहे. अहिराणी बोलीतील संवाद, निसर्गवर्णन आणि चित्रमय मांडणी यामुळे प्रत्येक प्रकरण वाचकाच्या मनात ठसा उमटवते. बाविस्करांनी स्वतः काढलेल्या चित्रांमुळे पुस्तक अधिक आकर्षक झाले आहे. ४१२ पानांचे हे पुस्तक असूनही त्यातील कथनशैली, नाट्यमयता आणि संयत विद्रोहामुळे एकही पान रटाळ वाटत नाही. वाङ्मयीन मूल्यांच्या कसदारतेमुळे हे पुस्तक २०२३-२४ पासून एम.ए. मराठीच्या ‘मराठी आत्मकथन’ अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्यात आले आहे.

गरिबीच्या अंधारातून कलेच्या प्रकाशाकडे जाणाऱ्या प्रवासाचे हे आत्मकथन वाचकाला प्रेरणा, संवेदना आणि माणुसकीची जाणीव करून देते. दलित साहित्याच्या परंपरेत हे आत्मकथन वेगळे ठरते कारण त्यात केवळ आक्रोश नाही, तर सकारात्मक संघर्ष, इमानदारी आणि मानवतावादी दृष्टिकोन दिसतो. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक परंपरेची आठवण करून देणारा हा साहित्यप्रवास असल्याचे मत साहित्यप्रेमी व्यक्त करत आहेत.

‘काळ्या निळ्या रेषा’ या आत्मकथनाने वास्तवाच्या गर्भात दडलेले सत्य शब्दरेषांमधून जिवंत केले आहे. साहित्य अकादमीने या पुस्तकाला पुरस्कार देत केलेला सन्मान मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेसाठीही महत्त्वाचा मानला जात आहे. अत्यंत साधे, विनम्र आणि निगर्वी व्यक्तिमत्त्व असलेल्या राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याने साहित्यविश्वातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Protected Content

Play sound