जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यात संभाजी ब्रिगेड व परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रविणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी आणि सखोल चौकशी केली जावी, या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
गेल्या रविवारी, दिनांक १३ जुलै २०२५ रोजी अक्कलकोट येथे प्रविणदादा गायकवाड यांच्यावर काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी शाईफेक करत, धक्काबुक्की करून आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करत गंभीर स्वरूपाचा हल्ला केला. या हल्ल्याची तुलना देशातील विचारवंतांवर झालेल्या हल्ल्यांशी करत कार्यकर्त्यांनी हा हल्ला व्यक्तिगत नसून, तो समता, बंधुता आणि न्यायाच्या तत्वांवर चालणाऱ्या संपूर्ण विचारप्रवाहावर असल्याचे स्पष्ट केले. कार्यकर्त्यांनी या घटनेला नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या घटनांशी जोडले आणि हल्लेखोर प्रवृत्तींना पोसणाऱ्या मानसिकतेवर सडकून टीका केली.

प्रसारमाध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार दीपक काटे या गुंडाने आठ ते दहा साथीदारांसह हा हल्ला केल्याचे उघड झाले आहे. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे स्थानिक पोलिसांनी या आरोपींना अटक न करता मुक्त सोडले, याबाबत संताप व्यक्त करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारच्या गृह विभागाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून दोषींना शिक्षा द्यावी, अन्यथा विचारवंतांना संपवण्याचे षड्यंत्र उघड होईल, अशी तीव्र इशारा दिला.
या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक श्याम पाटील, जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, शहर कार्याध्यक्ष मयूर चौधरी, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, बामसेफचे मुकुंद सपकाळे, मराठा सेवा संघाचे सुरेश पाटील, सुरेंद्र पाटील, राम पवार, शोभाराम प्रतिष्ठाचे नरेंद्र पाटील, जिल्हा संघटक गणेश पाटील, अनिरुद्ध शिसोदे, शुभम पवार, कल्पेश पाटील, भरत पाटील, अविनाश पाटील, संदीप मांडोळे, सतीश लाठी, राकेश राजपूत, राकेश जैन, संदीप पाटील, रविंद्र पाटील, धवल पाटील, प्रमोद पाटील, राहुल पाटील, संजय चव्हाण, सुमित्रा अहिरे, देवानंद निकम, रविंद्र तायडे, देशमुख साहेब आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या आंदोलनातून सरकारला एक स्पष्ट संदेश देण्यात आला की, विचारस्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय यांच्यावर हल्ला सहन केला जाणार नाही. समाजाला समतेच्या मूल्यांकडे घेऊन जाणाऱ्या नेतृत्वावर अशा पद्धतीने हल्ले होणे ही लोकशाहीसाठी घातक बाब आहे, आणि त्यामुळे तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे.



