पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित तरुणीवर झालेल्या अत्याचार आणि अमानुष हत्याकांड प्रकरणी पहूर येथे आज (दि.३) ऑक्टोबर रोजी सायंकाळी निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी तरुणीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी माजी कृषी सभापती प्रदीप लोढा, धनगर समाज उत्तर महाराष्ट्र संघर्ष समिती प्रमुख रामेश्वर पाटील, मानवाधिकार समितीच्या स्मिता भिवसने (पाचोरा) , अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी सुषमा चव्हाण, अॅड. एस. आर. पाटील, मानवाधिकार समितीचे उत्तर महाराष्ट्र संपर्क अधिकारी संतोष पाटील, चर्मकार समाज संघटनेचे पदाधिकारी प्रल्हाद वानखेडे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच निता पाटील यांनी उपस्थितांसमोर स्त्री अत्याचाराचा प्रतिकार करण्याची प्रतिज्ञा केली.
यावेळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश परदेशी यांना निवेदन देण्यात आले. कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यावेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. पहूर पोलिस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देशभरात वारंवार घडणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांनी समाजमन सुन्न झाले असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली. या मार्चमध्ये कैलास चव्हाण , सुभाष चव्हाण, माजी उपसरपंच रविंद्र मोरे, मेहतर समाज बांधवांसह पहूरकर सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हरीश धनजे यांनी केले.