महिलांच्या विविध मागण्यासंदर्भात निळे निशान संघटनेचे भुसावळ तहसील कार्यालयासमोर आंदोलन

भुसावळ/यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील महिलांच्या व सर्व सामान्य जनतेच्या विविध समस्यांच्या संदर्भात भुसावळ तहसिलदार कार्यालयासमोर निळे निशाण संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले. निळे निशान संघटनेच्या वतीने तहसीलदारांना खाली दिलेल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले.

१) तालुक्यातील अन्न सुरक्षा योजनेच्या यादीची चौकशी करून अपात्र व्यक्तींची नावे कमी करून खरोखर गरजु पात्र विधवा , परितक्ता , घटस्फोटित , अंध , अपंग व निराधार व्यक्तींना अन्न सुरक्षा योजनेच्या यादीत तात्काळ समाविष्ट करण्यात यावे.
२) तालुका स्तरावरिल रुग्णालय व गावपातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी प्रसुती करिता आलेल्या महिलांच्या उपचारा करिता तात्काळ तज्ञ डॉक्टरांची नेमणुक करण्यात यावी तसेच तालुका स्तरावर असलेल्या ग्रामिण रुग्णालयात गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी सिजर करण्याची आवश्यकता भासल्यास तात्काळ सिजर करण्यास कायस्वरूपी तज्ञ डॉक्टरांची नेमणुक करण्यात यावी.
३ ) तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या खाजगी कंपनीत तसेच विजनिर्मिती केंद्र भुसावळ येथे परप्रांतातुन पोटभरण्यास आलेल्या कंत्राटी स्वरूपाच्या कामगारांची कंत्राटदार यांच्याकडून होत असलेली पिळवणुक थांबवून खाजगी कंपन्या व विजनिर्मिती केंद्र दिपनगर या ठिकाणी स्थानिक बेरोजगारांना सुद्धा रोजगार उपलब्ध करून द्यावा.
४) महानगर पालिका / नगर पालिका क्षेत्रात अनेक बेघर भुमिहीन गरजु व्यक्तींना रहिवास करिता हक्काची जागा देण्यात यावी तसेच पात्र लाभार्थी यांना प्रधान मंत्री आवास योजनेचा लाभ मिळालेला नाही तरी त्याची चौकशी करून नगर पालिका क्षेत्रात अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या बेघर भुमिहिनांना जागेसह प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यात यावा .
५) महानगर पालिका / नगर पालिका / नगर परिषद क्षेत्रात महिला करिता ठिकठिकाणी प्रसाधन गृह तात्काळ उभारण्यात यावे.
६ ) तालुक्यात ज्या गांवामध्ये बौद्ध समाजाच्या वाडया वस्त्यांमध्ये हातभट्टी दारू विक्री होत असेल त्या हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध भारतिय न्याय संहिता चे कलम १२३ प्रमाणे कारवाई करण्यात यावी .
७) नगर पालिका हद्दीत व ग्रामिण भागात काही स्वार्थी व्यक्तींनी महसुल विभागाची दिशाभुल करून शासनाच्या नियम अटींचे उल्लंघन करून कुठल्याही प्रकार च्या मुलभुत सुविधा रस्ते लाईट गटारी न करून देता प्लॉट विक्री केली आहे तसेच शासनाची दिशाभुल करून नगर परिषदेच्या दप्तरी नोंद करून घेतलेली आहे असे बेकायदेशिर कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर शासनाची दिशाभुल करून सर्व सामान्यांची फसवणुक केल्या प्रकरणी कारवाई करण्यात यावी तसेच विक्री केलेल्या लेआऊट मध्ये रस्ते व गटारी बांधुन देण्याचे आदेश निर्गमीत करावे.

भुसावळ शहरात वर्दळीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी भुसावळ नगरपरिषदेने येत्या आठ दिवसात महिलांचे प्रसाधन गृह उभारण्याच्या दृष्टीने उपाय योजना न केल्यास दि. २८ ऑगस्ट २०२४ रोजी अनेक महिला आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असा इशारा निळे निशान संघटनेच्या महिला आघाडी जळगांव जिल्हा अध्यक्षा नंदाताई भावटे यांच्या प्रमुख उपस्थितीत भुसावळ तालुका अध्यक्षा निकिता भावटे, तालुका उपाध्यक्षा मनिषा लोखंडे, तालुका संपर्क प्रमुख मंदा साळवे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला.

त्याप्रसंगी फैजपुर विभागाचे उपाध्यक्ष अनिल इंधाटे, इकबाल तडवी, यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे, रावेर तालुका अध्यक्ष चंद्रकात सोनवणे, जळगांव तालुका अध्यक्ष गिता वाघ, यावल तालुका युवक अध्यक्ष सागर तायडे, यावल तालुका कार्याध्यक्ष मनिषा बागुल, सल्लागार विजयाताई सोनवणे व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content