सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका मुस्लिम महिलेचा सार्वजनिक ठिकाणी नकाब ओढल्याची कथित घटना समोर आल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेचा निषेध करत कौमी एकता फाऊंडेशनने महिलांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित केला असून, दोषींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कौमी एकता फाऊंडेशनच्या वतीने हे निवेदन फैजपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपतींना सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर कथित प्रकार महिलांच्या सन्मानाचा, वैयक्तिक स्वातंत्र्याचा तसेच धार्मिक भावनांचा गंभीर अवमान करणारा आहे. भारत हा लोकशाही व धर्मनिरपेक्ष देश असून प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा, पोशाख निवडीचा आणि सन्मानाने जगण्याचा संविधानिक अधिकार आहे, असे ठामपणे मांडण्यात आले आहे.

निवेदनात पुढे असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, जबाबदार घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशा स्वरूपाचे वर्तन होणे ही अत्यंत गंभीर बाब असून त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाण्याची तसेच सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी स्पष्ट आणि प्रभावी मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात यावीत, असेही निवेदनात नमूद आहे. कौमी एकता फाऊंडेशन रावेर-यावल तालुक्याचे अध्यक्ष शेख कुर्बान शेख करीम यांनी राष्ट्रपतींनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या निवेदनावर शेख कुर्बान शेख करीम, शेख इरफानशेख कुतुबुद्दीन, सैय्यद जावेद अहमद तसेच सैय्यद असगर सैय्यद तुकडू यांच्या स्वाक्षऱ्या असून, संघटनेने महिलांच्या सन्मानासाठी आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी आपली भूमिका ठामपणे मांडली आहे.



