ग. स. भरती प्रकरणी आ. चंद्रकांत पाटील यांचे उपनिबंधक कार्यालयासमोर आंदोलन !


मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि., जळगाव या संस्थेत सुरू असलेल्या लिपीक व शिपाई पदांच्या भरती प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत आमदार चंद्रकांत पाटील यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या भरती प्रक्रियेत नियम, कायदे व शासकीय परिपत्रकांचे उल्लंघन झाल्याचा आरोप असून, प्रकरणामुळे जिल्ह्यातील सहकारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आमदार पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत संस्थेच्या अध्यक्ष, संचालक मंडळ व व्यवस्थापक यांनी संगनमताने नियमबाह्य भरती प्रक्रिया राबविल्याचा आरोप केला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत नोकरभरतीसंबंधी ठराव मंजूर न करता वेगळाच विषय मांडून ठराव पारित करून घेण्यात आला. त्यामुळे संस्थेच्या सभासदांचा विश्वासघात व फसवणूक झाल्याच्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले आहे.

या तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी आदेश काढून सदर नोकरभरती प्रक्रियेला तात्काळ स्थगिती दिली होती. मात्र, केवळ दुसऱ्याच दिवशी म्हणजे दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी खुलासा मागविल्याचा दाखला देत हीच स्थगिती उठविण्याचा आदेश काढण्यात आला. एकाच प्रकरणात अवघ्या २४ तासांत परस्परविरोधी आदेश निघाल्याने संशय अधिक गडद झाला आहे.

या निर्णयांवर तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार चंद्रकांत पाटील यांनी या कथित बोगस भरती प्रक्रियेत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव हेही सामील असल्याचा गंभीर आरोप केला आहे. “एकीकडे स्थगिती देणे आणि लगेच दुसऱ्याच दिवशी ती उठविणे, हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असून यामागे मोठे आर्थिक हितसंबंध दडलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०, सहकारी संस्था नियम १९६१ तसेच भारतीय दंडसंहितेतील तरतुदींनुसार करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली आहे. 20 डिसेंबर रोजी या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भव्य आंदोलन होणार होते परंतु शनिवारी शासकीय सुट्टी असल्याकारणाने व रविवारी महाराष्ट्रभर नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीचे निकाल असल्याकारणाने भव्य आंदोलन या प्रकाराच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जळगाव येथे मोठ्या संख्येने भव्य असे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या आंदोलनामुळे सहकार विभागाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.