Home Cities जळगाव भाजपा आ. पडळकर यांचे निषेधार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे आंदोलन

भाजपा आ. पडळकर यांचे निषेधार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे आंदोलन

0
173

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यांचे निषेधार्थ आज जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील कार्यालयासमोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला चपला मारून व काळी शाई फासून निषेध नोंदवला.

यावेळी आंदोलकांनी एक प्रतीकात्मक कुत्रा आणला होता. जिल्हा कार्याध्यक्ष संग्राम सिंग सूर्यवंशी यांनी या कुत्र्याच्या गळ्यात “टोपीचंद” अशी पाटी टाकली. “गोपीचंद पडळकर हे भाजपाचा कुत्रा असून ते सतत भुंकत असतात. या कुत्र्याला भाजपाने आवर घालावा,” अशा संतप्त भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. पडळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) अनेक प्रमुख नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र प्रदेश सचिव रवींद्र भैय्यासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, महानगर अध्यक्ष एजाज मलिक, महिला अध्यक्ष मंगला पाटील, कल्पिता पाटील, युवक अध्यक्ष रिंकू चौधरी, माजी नगरसेवक सुनील माळी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी पडळकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

राजकीय वर्तुळात वादाची ठिणगी
जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात एक नवा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या या तीव्र आंदोलनामुळे भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष अधिकच वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची वैयक्तिक पातळीवरची टीका राज्याच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी नाही, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

निषेधाची लाट राज्यभर
केवळ जळगावातच नव्हे, तर राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पडळकर यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत आहेत. ठिकठिकाणी निदर्शने, आंदोलने आणि निवेदन सादर करून पडळकर यांना अटक करण्याची मागणी होत आहे.


Protected Content

Play sound