Home Cities जळगाव नागरी सुविधांवरून संतप्त महिलांचे ठिय्या आंदोलन !

नागरी सुविधांवरून संतप्त महिलांचे ठिय्या आंदोलन !


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात जुना खेडी रस्ता व आजूबाजूच्या परिसरातील महिला आज रस्त्यावर उतरल्या. महापालिका प्रशासनाच्या दीर्घकालीन दुर्लक्षाविरोधात त्यांनी आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत नागरी सुविधांबाबत जोरदार आवाज उठवला. शांततेत पार पडलेल्या या आंदोलनाने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

जुना खेडी रस्ता, डीएनसी कॉलेज परिसर, दत्तनगर, सुनंदिनी पार्क आणि गट क्रमांक 75 ते 78 या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था, गटारांची दुरुस्ती, वीज डीपींचा अभाव तसेच कचऱ्याच्या समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महिलांनी एकत्र येत ठोस कृतीची मागणी केली. आंदोलनादरम्यान महिलांनी प्रशासकीय दुर्लक्षाविरोधात “फक्त आश्वासन नको, कृती हवी” अशा घोषणा दिल्या.

शांततेत पार पडलेल्या या आंदोलनात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. आंदोलक महिलांचे शिष्टमंडळ आणि माजी नगरसेवक भरत सपकाळे यांनी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची भेट घेतली. त्यांनी आपल्या भागातील समस्यांचा सविस्तर पाढा आयुक्तांसमोर मांडला. विशेषतः पावसाळ्यात रस्ते व गटारांची दयनीय अवस्था, कचऱ्याचे ढीग आणि रात्रीच्या वेळेस अंधारमय गल्लीबोळ यामुळे महिलांना आणि लहान मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

यावेळी आयुक्त ढेरे यांनी महिलांना आश्वस्त करत सांगितले की, 58 कोटींच्या मंजूर निधीमधून या भागात रस्ते व गटाराच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे आणि कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. मात्र, महिलांनी यावर नाराजी व्यक्त करत “आता बोलण्यापेक्षा कृती महत्त्वाची” अशी ठाम भूमिका घेतली. त्यांनी काम तत्काळ सुरू न झाल्यास पुढील आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.

यावेळी काही काळ महिलांचा प्रशासनाशी वाद झाला. संतप्त महिलांनी प्रशासकीय आश्वासनांवर विश्वास न ठेवता वेळेवर कृती झाली पाहिजे, असा ठाम पवित्रा घेतला. या आंदोलनामुळे महापालिका प्रशासन जागे होईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. यावेळी परिसरातील अनेक पुरुषांनीही या महिलांच्या आंदोलनाला पाठींबा दिला.


Protected Content

Play sound