Home Cities अमळनेर अमळनेरात माजी आमदार शिरीष चौधरींच्या वक्तव्यांचा निषेध

अमळनेरात माजी आमदार शिरीष चौधरींच्या वक्तव्यांचा निषेध


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या पदग्रहण सोहळ्यात माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आमदार अनिल पाटील यांच्या पत्नीबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे अमळनेर शहरात तीव्र संतापाची लाट उसळली. या वक्तव्याच्या निषेधार्थ काल शहरातील महिला, कार्यकर्ते, युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत पालिकेसमोर जोरदार आंदोलन केले.

हजारोंच्या जमावाने पालिकेसमोर एकत्र येत माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या पुतळ्यास चपलांचा व जोडे मारून निषेध व्यक्त केला. महिलांनी पुतळ्यास बांगड्यांचा हार घालत महिलेच्या सन्मानाचा अपमान झाल्याचा तीव्र निषेध नोंदवला. त्यानंतर पुतळादहन करण्यात आले. या आंदोलनामुळे अमळनेर शहर व तालुक्यात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

याच दरम्यान आंदोलक जमाव शिरीष चौधरी यांच्या स्टेशन रोडवरील निवासस्थानीही धडकला. तेथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही आंदोलकांनी निषेध म्हणून चौधरी यांच्या घराच्या दिशेने बांगड्या फेकल्या. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली.

माजी आमदार चौधरी यांचे वक्तव्य फेसबुक लाईव्हद्वारे प्रसारित झाले होते. या भाषणाच्या क्लिप्स शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर महिला व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप पसरला. सुरुवातीला सोशल मीडियावरून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर दुपारी तीन वाजल्यानंतर शहर व ग्रामीण भागातील हजारो नागरिक पालिकेसमोर एकत्र आले. महिलांनी मनोगत व्यक्त करत महिलेच्या अपमानाचा निषेध केला व माजी आमदारांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.

यानंतर हा जमाव मोर्चाच्या स्वरूपात शिरीष चौधरी यांच्या कार्यालयासमोर पोहोचला. तेथे घोषणाबाजी केल्यानंतर महाराणा प्रताप चौकात टायर जाळून निषेध नोंदवण्यात आला. पुढे हा मोर्चा आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी गेला. तेथे भाजपाचे ॲड. व्ही. आर. पाटील, हिरालाल पाटील, भागवत पाटील, मनोज पाटील व प्रा. मंदाकिनी भामरे यांनी मनोगत व्यक्त करून या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. हा प्रकार अमळनेर तालुक्यातील प्रत्येक महिलेचा अपमान असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

यावेळी आमदार अनिल पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना माजी आमदारांच्या वक्तव्यावर कडाडून टीका केली. तालुक्यात पुन्हा एकदा विचित्र संस्कृती व गुंडाराज येत असल्याचे त्यांच्या भाषणातून दिसून येत असल्याचा आरोप करत, “हेच अमळनेरला पाहिजे होते का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपण लोकशाही मार्गाने त्यांना विधानसभेतून घालवले, तरीही पालिका निवडणुकीत जनतेचा कौल स्वीकारून शुभेच्छा दिल्या, मात्र त्यांना यश पचविता आले नाही, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, संघर्ष करायचा असेल तर माझ्याशी समोरासमोर मुकाबला करायला हवा होता. महिलांचा असा अपमान करणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. एखाद्या महिलेने समाजात सक्रिय भूमिका घेतली म्हणून तिच्या चारित्र्यावर किंवा कुटुंबावर प्रश्न उपस्थित करणे ही विकृती असल्याची टीका त्यांनी केली. माझी पत्नी गेल्या ३० वर्षांपासून माझ्या सामाजिक व राजकीय कामात सक्रिय असून समाजातील विविध नात्यांशी जोडून काम करते, हेच काहींना सहन झाले नसावे, असेही ते म्हणाले.

महिलांच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरलेल्या महिला भगिनी व जनतेचे ऋण व्यक्त करत, अमळनेरची सुरक्षितता राखणे हे आमदार म्हणून माझे कर्तव्य असून ते मी कधीही सोडणार नाही, अशी ग्वाही आमदार अनिल पाटील यांनी दिली.


Protected Content

Play sound