जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे परिसरात केवळ चार वर्षांच्या निरागस कुमारी यज्ञा दुसाने हिच्यावर झालेला अमानुष अत्याचार आणि निर्घृण खून या भयावह घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या दुष्कृत्यामुळे सुवर्णकार समाजासह सर्वच समाजघटकांच्या मनात तीव्र अस्वस्थता व वेदना असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी एकमुखी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर समाजातील विविध संघटनांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन पाठवले आहे.
यज्ञा दुसाने या चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराने समाजातील प्रत्येक सुजाण नागरिकाला हादरवून सोडले आहे. केवळ निरपराध बालिकेचे जीवन हिरावून नेणारा हा कृतघ्न प्रकार करणारे नराधम समाजात राहण्यास पात्र नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. न्याय मिळेपर्यंत समाज शांत बसणार नाही, असा इशारा निवेदनकर्त्यांनी सरकारला दिला आहे.

या निवेदनामध्ये प्रमुख मागणी अशी की आरोपीला तात्काळ अटक करून शक्य तितकी कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी. तसेच हे प्रकरण विलंब न लावता फास्ट-ट्रॅक न्यायालयात चालवावे, ज्यामुळे यज्ञासाठी न्यायाचा मार्ग शिथिल होणार नाही. यासोबतच साने कुटुंबास शासनामार्फत योग्य संरक्षण, तसेच आवश्यक ती सर्व आर्थिक आणि मानसिक मदत मिळावी, अशीही महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात समाजातील विविध संघटना आणि पदाधिकारी यांची नावे असून या सर्वांनी एकत्र येऊन या प्रकरणाविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. निवेदन सादर करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा अध्यक्ष संजय बी. विसपुते, संत शिरोमणी नरहरी महाराज बहुउद्देशीय संस्था मेहरूणचे रमेश डी. सोनार, सुवर्णकार कारागीर संघ, सौ. रंजना विजय वानखेडे (अहीर सुवर्णकार महिला मंडळ), हितकारी सभा, खान्देश विभाग, तसेच शरद रमेश रणधीर (ऋणानुबंध वधू-वर पालक परिचय समिती) यांच्यासह अनेक समाजबांधवांचा सहभाग आहे.
ही घटना समाजाच्या अंत:करणाला चिरफाड करणारी असून अशा गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी कठोर आणि तात्काळ शिक्षा हा एकमेव मार्ग असल्याचे निवेदनकर्त्यांनी अधोरेखित केले आहे. यज्ञा दुसानेला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटना रोखता याव्यात, यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



