जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील धानवड येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून ५ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भिका बळीराम पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील धानवड गावात भिका बळीराम पाटील वय ५४ हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. २३ ते २४ जानेवारी च्या दरम्यान चोरट्यांनी भिका पाटील यांचे घर आणि शेजारी राहणारे साक्षीदार योगेश मानके यांच्या घराचे कुलूप तोडले. घरातील तिजोरी आणि कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याच्या अंगठ्या, गहू मणी माळ, टॉगल आणि रोख ३ लाख ७० हजार रुपये असा एकूण ५ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या धाडसी घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील हे करीत आहे.




