मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यात १९ ते २१ जुलै दरम्यान ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी पावसामुळे शेती शिवाराचे पिकांचे, घरांचे ,गोठयांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यात यावी, या मागणीचे निवेदन मुक्ताईनगर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले.
मुक्ताईनगर तालुक्यात १९, २० आणि २१ जुलै रोजी ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील गावांमध्ये शेती शिवाराचे पिकांचे , घरांचे ,गोठयांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. कुऱ्हा वढोदा परिसरात २१ जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे वढोदा, कुऱ्हा, सुळे, भोटा, रिगाव धुळे, चिंचखेडा खुर्द, तालखेडा हलखेडा, लालगोटा ,जोंधनखेडा, हिवरा, उमरा, पारंबी या व तालुक्यातील इतर गावात घरात पुराचे पाणी शिरल्याने अन्न धान्यासह जीवनाश्यक वस्तूंचे नुकसान झाले. घरातील किंमती सामान व गुरेढोरे वाहून जाऊन, घरांची पडझड होऊन मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच शेत शिवारातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अनेक हेक्टरवरील जमीन पिकांसहित खरडून गेलेली असुन शेतांचे बांध फुटले आहेत, काही ठिकाणी शेतात पाणी थांबले असून शेतांची अवस्था तलावाप्रमाणे झाली आहे यामुळे शेतातील उभे असलेले पिक पिवळे पडले असून त्यांच्या मुळा सडल्या आहेत. गुरांचे गोठे कोलमडून पडले असुन गुरांचा चारा, कुटार भिजले आहे.
तरी तातडीने झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे करून नुकसानग्रस्तांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी तालुकाध्यक्ष यु डी पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, शहराध्यक्ष राजेंद्र माळी, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे, माजी जि प सदस्य निलेश पाटील, माजी सरपंच प्रविण पाटील, तालुका सरचिटणीस रविंद्र दांडगे, सुनिल काटे, अतुल पाटील, साहेबराव पाटील, दिनकर पाटील, रउफ खान, सोनु पाटील, राहुल पाटील, संदिप ढिवरे, विशाल रोटे, मयुर साठे, मुश्ताक मण्यार, जुबेर अली, अयाज पटेल, फिरोज भांजा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.