जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्थानिक महिला बचत गट, उद्योजक आणि स्वयंसहाय्यता गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव शहरात ‘खान्देश महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले असून, येत्या २६ फेब्रुवारीपासून सागर पार्क येथे हा महोत्सव रंगणार आहे. ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर आधारित या महोत्सवातून स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळणार असून, नागरिकांना खान्देशच्या संस्कृतीचा अनोखा अनुभव घेता येणार आहे.
जळगाव महानगरपालिका आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव २६ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. या महोत्सवाचे हे सहावे वर्ष असून, स्थानिक बचत गट आणि महिला उद्योजकांसाठी हा एक महत्त्वाचा व्यासपीठ ठरणार असल्याची माहिती महापौर दीपमाला काळे यांनी दिली. याप्रसंगी उपमहापौर मनोज चौधरी, उपायुक्त निर्मला गायकवाड, शहर अभियान व्यवस्थापक गायत्री पाटील उपस्थित होते.

या महोत्सवात खान्देशातील संस्कृती, परंपरा आणि स्थानिक कौशल्यांचे दर्शन घडणार आहे. महोत्सवात एकूण १८० स्टॉल्स उभारण्यात येणार असून, त्यामध्ये महिला बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, घरगुती सजावटीच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने, किचन अप्लायन्सेस आणि विविध उपयुक्त वस्तूंचा समावेश असेल. याशिवाय खान्देशी पद्धतीचे अस्सल शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थही नागरिकांना चाखता येणार आहेत.
खरेदीसोबतच नागरिकांच्या मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देखील ठेवण्यात आली आहे. २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध अभिनेते ओम यादव यांच्या उपस्थितीत महिलांसाठी विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, यात पैठणी, राणीहार आणि आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच स्थानिक गायक, नृत्यगट आणि कलावंत आपली कला सादर करणार असून, लहान मुलांसाठी गेम झोन आणि जादूगाराचे प्रयोग हे विशेष आकर्षण ठरणार आहेत. उत्कृष्ट स्टॉलधारकांचा गौरव आणि उपयुक्त घरगुती वस्तूंचे बक्षीसही देण्यात येणार आहे.
महोत्सवात प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार असून, नागरिकांना कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती उपमहापौर मनोज चौधरी यांनी दिली. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापौर दीपमाला काळे यांनी जळगावकरांना आवाहन करताना सांगितले की, या महोत्सवात कुटुंबासह सहभागी होऊन स्थानिक महिला बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करावी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यास हातभार लावावा. हा महोत्सव स्थानिक कला, संस्कृती आणि उद्योजकतेचा उत्सव असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



