Home राजकीय माता-बाल आरोग्याला चालना; राज्यभर अभिनव उपक्रमांचा वेग वाढला : मुख्यमंत्री

माता-बाल आरोग्याला चालना; राज्यभर अभिनव उपक्रमांचा वेग वाढला : मुख्यमंत्री


मुंबई-वृत्तसेवा | महाराष्ट्रात माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी विविध अभिनव उपक्रम प्रभावीपणे राबविले जात असून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. खारघर (नवी मुंबई) येथील सिडकोच्या जागेवर उभारण्यात आलेल्या ‘श्री सत्य साई संजीवनी केंद्रा’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

या केंद्राच्या माध्यमातून राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत टू-डी-इको शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमधून जिल्हा रुग्णालयांमध्ये हृदयरोग तज्ज्ञांकडून एकूण 2,507 तपासण्या करण्यात आल्या. तसेच जन्मजात हृदयरोग (सीएचडी) असलेल्या 3,226 बालकांवर श्री सत्य साई संजीवनी केंद्रात यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि सातारा जिल्ह्यातील जावळी या आदिवासी भागांना दत्तक घेऊन विशेष आरोग्य उपक्रम राबविण्यात येत आहेत. यासोबतच पुण्यातील शहरी झोपडपट्ट्यांमध्ये आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यात आल्या असून रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातही आरोग्य सुविधा पोहोचविण्याचे काम सुरू आहे.

विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये बालकांमधील जन्मजात हृदयरोग तपासणीसाठी मेगा शिबिरे आयोजित करण्यात येत असून दुर्गम भागातील मुलांनाही अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

नवी मुंबई परिसरात बांधकाम व वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी विशेष आरोग्य प्रकल्प राबविण्यात येत आहेत. तसेच अंगणवाडी सेविकांसाठी नॉन-कम्युनिकेबल डिसीज (एनसीडी) व कर्करोग तपासणी प्रकल्पही सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, आशा, अंगणवाडी सेविका, सहाय्यक परिचारिका व वैद्यकीय अधिकारी अशा 3,500 हून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांना क्षमता विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि परिणामकारक करण्यासाठी हे उपक्रम महत्त्वाचे ठरत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound