Home Cities जळगाव  प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमरण उपोषण! प्रशासनाच्या ढिसाळपणावर संतापाचा उद्रेक

 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमरण उपोषण! प्रशासनाच्या ढिसाळपणावर संतापाचा उद्रेक

0
194


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अप्पर तापी प्रकल्पाच्या हतनूर धरणातील वितरण चारी क्रमांक ७ अंतर्गत अनवर्दे खुर्द येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना गेल्या ३५ वर्षांपासून संपादित जमिनीचा ना योग्य मोबदला मिळाला, ना पारदर्शकतेचा अनुभव. वारंवार संबंधित अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवूनही प्रश्न ऐकून घेतले गेले नाहीत. परिणामी, या अन्यायाविरोधात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अमळनेर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.

१० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता, अमळनेर येथील निम्न तापी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाबाहेर शेतकरी उत्तमराव भाऊराव बोरसे (पाटील) यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २० ते २५ शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ३० ते ३५ वर्षांपूर्वी त्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या होत्या, परंतु आजतागायत त्यांच्या मोबदल्याबाबत ना स्पष्टता मिळाली, ना कोणतीही आर्थिक भरपाई. या दीर्घकाळाच्या अन्यायामुळे शेतकरी वैफल्यग्रस्त झाले असून, त्यांना सरकारच्या आणि प्रशासनाच्या वागणुकीचा संताप आहे.

उमराव भाऊराव बोरसे (वय ७३) यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर या उपोषणामुळे काही अनुचित घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहील. उपोषणस्थळी उपस्थित असलेल्या इतर शेतकऱ्यांनीही या मुद्द्याला न्याय मिळेपर्यंत लढा थांबवणार नसल्याचे ठामपणे सांगितले.

शेतकऱ्यांनी यापूर्वीही या प्रश्नावर अनेक वेळा पाठपुरावा केला. पण प्रत्येक वेळी आश्वासनांच्या पोकळ जाळ्यातच त्यांना अडकवण्यात आले. मोबदला देण्याची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि वेळेत पूर्ण केली जावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र आजपर्यंत कुठलीही ठोस कारवाई झाली नसल्याने उपोषणाशिवाय पर्याय उरला नाही, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.


Protected Content

Play sound