उपोषणाच्या इशारानंतर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत दारूबंदीचा ठराव मंजूर

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत दारूबंदी ठराव मंजूर करण्यात आला आहे. याबाबत ग्रामस्थ मुबारक तडवी यांनी ५ सप्टेंबर रोजी तक्रार अर्ज केला होता. त्यांनी उपोषणाचा इशाराही दिला होता.

शेवटी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचाय सदस्य यांनी सदर अर्जाची गांभीर्याने दखल घेतली. त्यानंतर चुंचाळे गावात दारूबंदी करण्यात यावी असे ८ ऑक्टोंबर च्या मासिक सभेत ठराव सर्वानुमते करण्यात आला. १० ऑक्टोंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालया समोर उपोषणास बसू नये अशी विनंती केली. सदर ठराव दारूबंदी विभाग जळगाव, पोलीस स्टेशन यावल, व पंचायत समिती यावल, येथे पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले. तरी आपण आपले उपोषण मागे घेऊन ग्रामपंचायत प्रशासनास सहकार्य करावे असे ग्रामपंचायतीने मुबारक तडवी यांना पत्र दिले म्हणून त्यांनी उपोषणास न बसण्याचा निर्णय घेतला आहे, या निर्णयाचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.

Protected Content