लखनऊ (वृत्तसंस्था) आदर्श अचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर ४८ तासांसाठी प्रचारबंदीची कारवाई केली केली आहे. त्यामुळे योगी पुढचे तीन दिवस तर मायवती दोन दिवस प्रचार करु शकणार नाहीत. दरम्यान, मंगळवारी सकाळी म्हणजे १६ एप्रिल सकाळी सहा वाजल्यापासून ही प्रचारबंदी अंमलात येणार आहे.
भाषणाच्यावेळी दोन्ही नेत्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. सात एप्रिल रोजी सहारनपूर देवबंद येथे सपा आणि बसपाच्या संयुक्त सभेत केलेल्या वक्तव्या प्रकरणी मायावतींवर ४८ तास प्रचारबंदीची कारवाई करण्यात आली आहे. तर मेरठ येथील सभेत आदित्यनाथ यांनी केलेल्या अली आणि बजरंग बली वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. योगीचे वक्तव्य चिथावणीखोर असल्याचा निष्कर्ष आयोगाने काढला आहे.