जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गणित क्षेत्रातील सखोल आणि मूळ संशोधनासाठी दिला जाणारा मानाचा ‘५ वा गणित रत्न २०२६’ पुरस्कार भारतीय विज्ञान संस्था (IISc), बेंगळुरू येथील प्रा. वामसी प्रिथम पिंगळी यांना जाहीर झाल्याने शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रा. पिंगळी यांच्या जागतिक स्तरावर गाजलेल्या गणितीय संशोधनाची दखल घेत ‘प्रोफेसर ठाकरे गौरव संस्थे’तर्फे हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. गणित क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, हा सन्मान त्यांच्या संशोधन कार्याला मिळालेली मोठी दाद मानली जात आहे.

हा भव्य पुरस्कार सोहळा येत्या मंगळवारी, ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता सोलापूर येथील संगमेश्वर कॉलेजमधील ‘कर्मयोगी आप्पासाहेब कडादी सभागृहात’ पार पडणार आहे. या कार्यक्रमाला शैक्षणिक, औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
या सोहळ्यात खासदार पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते प्रा. पिंगळी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याच वेळी संगमेश्वर कॉलेजच्या नूतन सभागृहाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रायव्हेट लिमिटेड, सोलापूरचे व्यवस्थापकीय संचालक इंजि. शरद ठाकरे हे असतील, तर श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष धर्मराज कडादी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढणार आहे.



