यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील उंटावद गावात अलीकडेच एक प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक कार्यक्रम पार पडला. यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. संजय दिनकर पाटील आणि बिडगाव विद्यालयाचे शिक्षक संजय विक्रम पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आणि ह.भ.प. महेश महाराज यांच्या कन्या कु. वैष्णवी महेश पाटील हिने दहावीमध्ये ९३.६०% गुण मिळवून किनगाव केंद्रात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड, उंटावद यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तसेच संगीतम ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा विनोदकुमार पंडितराव पाटील उपस्थित होते. त्यांच्यासोबत सतीश पंडितराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल दंगलराव साठे, चेअरमन शशिकांत (शशी आबा) गुलाबराव पाटील, गावचे सरपंच छोटू भगवान भिल, प्रा. विश्वनाथ एकनाथ पाटील (डांभुर्णी) यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

या सोहळ्यात प्रा. संजय दिनकर पाटील यांच्या प्रदीर्घ व यशस्वी शैक्षणिक सेवेला उजाळा देण्यात आला. त्यांच्या विद्यार्थ्यांवर केलेल्या सकारात्मक परिणामाची आणि शिस्तप्रियतेची उपस्थितांनी प्रशंसा केली. शिक्षक संजय विक्रम पाटील यांच्या शैक्षणिक योगदानालाही मान्यवरांनी सलाम केला. त्यांच्या सेवाभावामुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीवन उजळले, असे गौरवोद्गार काढण्यात आले.
दुसरीकडे, कु. वैष्णवी पाटील हिने मिळवलेले यश हे संपूर्ण गावासाठी अभिमानास्पद असल्याचे मान्यवरांनी सांगितले. तिच्या अभ्यासू वृत्तीचे आणि कुटुंबातील धार्मिक वातावरणाचे श्रेय देताना, उपस्थितांनी तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अशा गुणवंत विद्यार्थिनीचा गौरव करणे हे समाजाचे कर्तव्य असल्याचे चेअरमन शशी आबा यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आयोजन ग्रामस्थांच्या एकात्मतेतून अतिशय सुंदररीत्या पार पडले. सचिव तोताराम सुपडू भारंबे, विवेक पाटील, दिलीप पाटील, अरुण सोनवणे, विजय पाटील, रविंद्र पाटील, साहेबराव पाटील, त्र्यंबक पाटील, शांताराम पाटील, डिगंबर सपकाळे, किशोर सपकाळे, जगदीश पाटील, मुरलीधर पाटील, विकास पाटील, अशोक महाजन, सचिव संजय दिनकर महाजन, मयूर पाटील आदींनी कार्यक्रमात सहभाग घेतला.



