जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची दखल घेत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र दत्तात्रय कुळकर्णी यांना क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेतर्फे (UICT) ‘आजीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. ६ जानेवारी २०२६ रोजी विद्यापीठात आयोजित “रासायनिक तंत्रज्ञान आणि संलग्न विज्ञानातील प्रगती” या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेतील विशेष सोहळ्यात पद्मश्री प्रा. डॉ. जी. डी. यादव (मुंबई) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी होते. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, रसायन तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ. ए. के. गोस्वामी, विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य एस. एस. राजपूत आणि परिषदेचे समन्वयक डॉ. राजकुमार शिरसाम उपस्थित होते. प्रा. आर. डी. कुळकर्णी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या सोहळ्यास उपस्थित राहिले.

नांदर (जि. नांदेड) या छोट्या गावातून सुरू झालेला प्रा. कुळकर्णी यांचा शैक्षणिक प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. लहानपणी पितृछत्र हरवल्यानंतर त्यांच्या मातोश्रींनी अपार कष्ट घेत त्यांचे शिक्षण पूर्ण केले. छत्रपती संभाजीनगर येथून मॅट्रिक पूर्ण केल्यानंतर त्यांनी रसायन तंत्रज्ञान संस्था (ICT), मुंबई येथून पदवी संपादन केली आणि नागपूरच्या लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्थेतून सुवर्णपदकासह एम. टेक. पदवी प्राप्त केली.
खासगी क्षेत्रातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून भावी पिढी घडविण्याच्या तळमळीतून त्यांनी शिक्षकी पेशाला प्राधान्य दिले. गुजरातमध्ये अध्यापनाची सुरुवात केल्यानंतर ते जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान विभागात रुजू झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाला १० कोटी रुपयांहून अधिक संशोधन निधी मिळाला असून, संशोधन संस्कृतीला भक्कम चालना मिळाली.
प्रा. कुळकर्णी यांनी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आणि सध्या कुलगुरू म्हणून जबाबदारीने पद सांभाळत नव्या शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अंमलबजावणीत मोलाचे योगदान दिले आहे. विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, उद्योग-संशोधन समन्वय आणि गुणवत्ता-वाढ यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले हजारो विद्यार्थी आज देश-विदेशातील नामांकित उद्योग व संस्थांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत.
या सोहळ्यात त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक करत ‘शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ’ आणि ‘अविरत प्रकाशस्त्रोत’ अशा शब्दांत गौरव केला. याच कार्यक्रमात विद्यापीठाने जम्मू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) सोबत सामंजस्य करार केला. या करारावर IIT जम्मूच्या वतीने प्रा. योगेंद्र निमदेव आणि विद्यापीठाकडून कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या करारातून विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, सुलभ प्रवेश प्रक्रिया, संशोधन सहाय्य, थेट प्रवेश तसेच संयुक्त कार्यशाळा व सेमिनारचे आयोजन करण्यात येणार आहे.
तसेच रसायन तंत्रज्ञान संस्थेतर्फे www.ats@nmu.ac.in या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. या संकेतस्थळाद्वारे संशोधनासाठी उपलब्ध विविध नमुन्यांच्या निष्कर्ष तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी भारतीय केमिकल इंजिनिअर संस्थेशी संलग्न विद्यापीठातील रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्टुडंट चॅप्टर माहितीपत्रकाचेही विमोचन करण्यात आले, ज्यातून विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जी. ए. उस्मानी यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. राजकुमार शिरसाम यांनी केले. यावेळी प्रा. जे. बी. नाईक, प्रा. आर. पी. गोरे, प्रा. उज्वल पाटील, प्रा. तुषार देशपांडे, प्रा. डॉ. विशाल पराते, प्रा. डॉ. भूषण चौधरी, प्रा. जे. एस. नारखेडे, प्रा. जी. ए. बाठे, प्रा. पवन मेश्राम, प्रा. विकास पाटील, प्रा. महेंद्र बारी, प्रा. उदय बागले, प्रा. किशोर पवार, प्रा. रामटेके, कक्ष अधिकारी संजय सपकाळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी, कर्मचारी, संशोधक, माजी विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



