Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगरचे प्रा. ललित कांडवेलकर यांना मुंबई विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान

मुक्ताईनगरचे प्रा. ललित कांडवेलकर यांना मुंबई विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान

0
166

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी प्रा. ललित काशिनाथ कांडवेलकर यांनी साध्य केली असून, त्यांना मुंबई विद्यापीठामार्फत पीएचडी (डॉक्टरेट) ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या यशामुळे केवळ कुटुंबीयांनाच नव्हे तर संपूर्ण मुक्ताईनगर तालुक्याला गौरवाची अनुभूती मिळाली आहे.

मुक्ताईनगर येथील रहिवासी असलेले प्रा. ललित कांडवेलकर हे श्री. काशिनाथ कांडवेलकर गुरुजी व सौ. पुष्पा कांडवेलकर यांचे सुपुत्र आहेत. सध्या ते चिपळूण येथील कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असून, याच शैक्षणिक ट्रस्टचे उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. अध्यापनासोबतच शैक्षणिक प्रशासन आणि संशोधन या तिन्ही क्षेत्रांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

कोकण विभागात वारंवार उद्भवणाऱ्या पूर, भूकंप तसेच इतर नैसर्गिक आपत्तींचा हॉटेल उद्योगावर आणि त्यातील विविध घटकांवर होणारा परिणाम अभ्यासाच्या केंद्रस्थानी ठेवत त्यांनी आपला संशोधन प्रबंध सादर केला. “A Study of the Effects and Challenges of Disasters on Hotel Industry and its Stake holders” या विषयावर आधारित या संशोधनातून हॉटेल उद्योगासमोरील आव्हाने, व्यवस्थापनातील बदल तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या नव्या दृष्टीकोनावर सखोल प्रकाश टाकण्यात आला आहे.

कोकणातील हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयांमध्ये पीएचडी प्राप्त करणारे प्रा. कांडवेलकर हे पहिले प्राध्यापक ठरले असून, त्यांच्या या यशाचा थेट लाभ महाविद्यालय, विद्यार्थी तसेच पर्यटन व हॉटेल व्यवसायाशी संबंधित घटकांना होणार आहे. त्यांच्या संशोधनामुळे आपत्तीग्रस्त परिस्थितीत हॉटेल उद्योग अधिक सक्षमपणे कसा उभा राहू शकतो, याबाबत मार्गदर्शन मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रा. ललित कांडवेलकर यांच्या या उल्लेखनीय यशामुळे मुक्ताईनगरमधील विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळणार असून, शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात पुढे जाण्याचा नवा आदर्श निर्माण झाला आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल मुक्ताईनगर शहरातून सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Protected Content

Play sound