जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावच्या शैक्षणिक वर्तुळासाठी अभिमानाची बातमी समोर आली असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील गणितशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. किशोर फकीरा पवार यांची इंदिरा गांधी राष्ट्रीय जनजाती विद्यापीठच्या व्यवस्थापन परिषदेवर (Executive Council) सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महामहिम राष्ट्रपती महोदयांकडून हे नामनिर्देशन करण्यात आले असून १८ फेब्रुवारी २०२६ पासून पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती लागू राहणार आहे.
विद्यापीठाच्या नियमानुसार (Statute 11(g)) करण्यात आलेली ही नियुक्ती अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. राष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाल्याने जळगावसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे. प्रा. पवार यांच्या नियुक्तीमुळे स्थानिक पातळीवरील शैक्षणिक नेतृत्वाला राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व मिळाले आहे.

प्रा. किशोर पवार हे केवळ ज्येष्ठ गणितज्ज्ञ म्हणूनच नव्हे, तर प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातही सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत ९ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली असून ५ विद्यार्थी सध्या संशोधन करत आहेत. त्यांच्या ५४ संशोधन निबंधांचे प्रकाशन झाले असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी आपल्या संशोधनाची छाप पाडली आहे. गणित विषयातील त्यांच्या सखोल अभ्यासामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
प्रशासकीय अनुभवाच्या बाबतीतही त्यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. प्रभारी कुलसचिव, प्रभारी संचालक (परीक्षा व मूल्यमापन मंडळ) तसेच विद्या परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सध्या ते पीजी जिमखान्याचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय नंदुरबार येथील आदिवासी अकादमीचे संचालक म्हणून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.
शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातही त्यांची ओळख ठळक आहे. उत्कृष्ट सायकलिस्ट, बॅडमिंटनपटू आणि क्रिकेटपटू म्हणून त्यांनी राष्ट्रीय व राज्यस्तरीय विद्यापीठ स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे. जळगाव जिल्ह्यातील विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध असून समाजकार्यातही ते सक्रिय असतात.
या नियुक्तीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे आणि कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजूदादा नन्नवरे, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिसभा सदस्य आणि शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांनीही प्रा. पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.



