मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये खासगी बांधकाम करणार्याने चक्क रस्त्यात गटर खोदून ठेवल्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होत असून नगरपंचायत प्रशासनाने यावर काहीही कार्यवाही न केल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, मुक्ताईनगर बस स्थानकाच्या मागील बाजूस मोठी रहिवासी वस्ती असून येथे आधीच नागरी सुविधांची वानवा आहे. प्रभाग क्रमांक-१३ मध्ये समाविष्ट असणार्या या भागाला सध्या कुणीच वाली उरलेला नाही. यात अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या बस स्थानकाकडून खालील बाजूस जाणार्या रस्त्यावर एकाने बांधकाम सुरू केले आहे. आता कुणीही व्यक्ती बांधकाम करत असतांना कुणी आक्षेप घेऊ शकत नाही. मात्र या व्यक्तीने आपले बांधकाम सुरू असतांना रस्त्यात येईल अशा प्रकारे गटार खोदून ठेवली असून याचा येथून ये-जा करणार्यांना मोठा त्रास होत आहे.
आज या रस्त्यावरून दोन वाहनधारक खाली पडले असून यातील एक जण जखमी झालेला आहे. तसेच या रस्त्यावरून वाळू तसेच अन्य गौण खजिन आणि अन्य वाहतूक करणारी वाहने देखील मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात. या माणसाने गटार खोदून ठेवल्यामुळे नागरिक अजून त्रस्त झालेले आहेत. यातच रात्री तर गटार दिसत देखील नसल्याने अशाच प्रकारचे लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
एकीकडे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असतांना दुसरीकडे मुक्ताईनगर नगरपंचायत प्रशासन हे मात्र ढिम्म असल्याचे दिसून येत आहे. शहराच्या अनेक भागात समस्या आ वासून असतांना प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, प्रभाग क्रमांक-१३ मधील गटारबाबत कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.