धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या व प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या तापी- पूर्णा राज्यस्तरीय पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली. त्यात येथील पी.आर.हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रा.बी.एन.चौधरी यांच्या ‘बंधमुक्त काव्यसंग्रह’ ला उत्कृष्ट काव्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
फाउंडेशनचे अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर व उपाध्यक्ष निंबाजी हिवरकर यांनी एका पत्रान्वये या पुरस्कारांची नुकतीच घोषणा केली आहे. प्रा.बी.एन.चौधरी हे गेल्या पंचवीस वर्षापासून साहित्य क्षेत्रात कार्यरत असून येथील साहित्य कला मंच या संस्थेचे अध्यक्ष आहेत. दि. ६ व ७ जून रोजी मुक्ताईनगर येथे संपन्न होणाऱ्या ५७ व्या अखिल भारतीय अंकूर मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष डॉ. किसन पाटील व सुप्रसिध्द गीतकार प्रविण दवणे यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होणार आहे. ‘बंधमुक्त’ला याआधी जळगाव येथील सूर्योदय साहित्य मंडळाचा’ विभावना’ काव्य पुरस्कार जाहीर झालेला आहे. प्रा.बी.एन.चौधरी यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.