नवी दिल्ली । राहूल गांधी यांनी दिलेल्या इशार्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले असून भाजप सरकारने अर्थव्यवस्थेला बुडविल्याचा आरोप प्रियंका गांधी-वधेरा यांनी केला आहे.
कोरोनामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम दिसून आला आहे. देशाच्या पहिल्या तिमाहीमध्ये सकल घरेलू उत्पादनात तब्बल २३.९ टक्क्यांची ऐतिहासिक घसरण नोंदविण्यात आली आहे. यावरून प्रियंका गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
या संदर्भात प्रियंका यांनी ट्विट केले आहे. यात म्हटले आहे की, सहा महिन्यांपूर्वी राहुल गांधी आर्थिक त्सुनामीबाबत बोलले होते. कोरोना संकटावेळी हत्तीच्या दातांसारखे दाखवणारे एक पॅकेज घोषित झाले. मात्र, आजची परिस्थिती पाहा. जीडीपी -२३.९ टक्के, भाजपा सरकारने अर्थव्यवस्थेला बुडविले, असे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदीजी, आता तरी मान्य करा की ज्याला तुम्ही मास्टर स्ट्रोक म्हटले, तो खरंतर आपत्ती स्ट्रोक होता! नोटाबंदी, चुकीची जीएसटी आणि देशबंदी (लॉकआऊट), असे रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.