मुंबई (वृत्तसंस्था) आगामी लोकसभा निवडणुक लढवण्यास अनुत्सुक असलेल्या दिग्गज नेत्यांची सुरु असलेली मनधरणी करण्यात कॉंग्रेसला यश आले आहे. त्यानुसार मिलिंद देवरांपाठोपाठ काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त या निवडणूक लढविण्यास तयार झाल्याचे वृत्त आहे.
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून प्रिया दत्त निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत. प्रिया दत्त या दिवंगत अभिनेते आणि काँग्रेस नेते सुनिल दत्त यांची कन्या. सुनिल दत्त यांच्या मृत्यूनंतर 2009 मध्ये प्रिया दत्त यांनी उत्तर मध्य मुंबईच्याच जागेवरुन खासदारकी मिळवली होती. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपच्या पूनम महाजनांकडून पराभवाचा धक्का बसला होता. सुरुवातीला प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र 2014 मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रिया दत्त मैदानात उतरण्याची चिन्ह आहे.दरम्यान, या मतदार या संघावर अभिनेत्री नगमा, कृपाशंकर सिंह यानीही उत्तर मध्य मुंबई मतदारसंघावर दावा सांगितला होता.