Home आरोग्य रावेर तालुक्यात खाजगी रुग्णालयांचा कडकडीत बंद; रुग्णसेवा ठप्प

रावेर तालुक्यात खाजगी रुग्णालयांचा कडकडीत बंद; रुग्णसेवा ठप्प

0
179

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) यांनी 5 सप्टेंबर 2025 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेच्या निषेधार्थ रावेर तालुक्यातील रावेर, सावदा, फैजपूर व यावल येथील सर्व खाजगी डॉक्टर्सनी 18 सप्टेंबर सकाळी 8 वाजेपासून 19 सप्टेंबर सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासांचा सेवा बंद आंदोलनात सहभाग घेतला. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) च्या ताप्ती व्हॅली ब्रांच अंतर्गत आलेल्या सर्व डॉक्टरांनी एकजूट दाखवत खाजगी रुग्णालये पूर्णतः बंद ठेवली, त्यामुळे रावेर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी उसळली.

ही निषेधात्मक भूमिका घेतली गेली ती महाराष्ट्र सरकार व एमएमसीने B.H.M.S. व C.C.M.P. डॉक्टरांना केवळ एक वर्षाच्या फार्माकोलॉजी अभ्यासानंतर एलोपॅथी डॉक्टरांच्या कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या अधिसूचनेविरोधात. डॉक्टरांच्या मते, हा निर्णय केवळ एलोपॅथी वैद्यक पद्धतीसाठीच नव्हे, तर रुग्णांच्या आरोग्यासाठीही अत्यंत धोकादायक आहे. दीर्घ व सखोल वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या एमबीबीएस, एमडी, एमएस, एमसीएच, डीएम व डीएनबी डॉक्टरांच्या पंक्तीत एक वर्षाचा अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांना बसवणे हा अन्याय असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

या प्रकरणासंदर्भात न्यायालयात याचिका प्रलंबित असतानाही शासनाने अशा प्रकारची अधिसूचना जारी करणे हे न्यायप्रक्रियेच्या विरोधात असून, त्यामागे असलेल्या उद्देशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर ताप्ती व्हॅली आयएमए ब्रांचने राज्यव्यापी एलोपॅथी डॉक्टर्सच्या आंदोलनाला पाठिंबा देत रावेर तालुक्यातील सर्व खाजगी वैद्यकीय सेवा पूर्णपणे बंद ठेवल्या.

या बंदमध्ये रावेर, सावदा, फैजपूर आणि यावल येथील सर्व खाजगी डॉक्टरांनी सहभाग घेतला. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील, सचिव डॉ. सुचिता कुयटे आणि डॉ. उमेश पिंपळे यांनी डॉक्टरांना वेळोवेळी माहिती पुरवत सेवा बंदबाबत योग्य मार्गदर्शन केले. डॉक्टर्सनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर शासनाने तातडीने ही अधिसूचना मागे घेतली नाही, तर बेमुदत सेवा बंद पुकारण्यात येईल.


Protected Content

Play sound