जळगाव प्रतिनिधी । जेलमध्ये निकृष्ट जेवण मिळत असल्याचा आरोप करीत दहा कैद्यांनी कारागृह रक्षकांवर हल्ला चढवल्याची घटना घडली असून या कैद्यांना जालना येथे हलवण्यात आले आहे.
जळगाव कारागृह हे नेहमी चर्चेत असते. अलीकडेच तीन कैद्यांनी भर दिवसा पलायन केल्यामुळे देशभरात गाजलेल्या जळगाव जेलमध्ये आता कैद्यांनी थेट कर्मचार्यांवर हल्ला केल्याचे प्रकरण घडले आहे. २४ रोजी ही घटना घडली. जेवणाप्रसंगी मिथुनसिंग बावरी गँगने कारागृह रक्षकांशी वाद घालून तुंबळ हाणामारी केल्याची घटना घडली.
दि. २४ रोजी जेवण निकृष्ट असल्याच्या आरोप करून रवीसिंग बावरी, राम जाने, मिथुनसिंग व दहा कैद्यांनी कारागृह कर्मचार्यांशी वाद घातला. यानंतर कैद्यांकडून कर्मचार्यांना मारहाण होत असल्याचे पाहत कारागृह अधीक्षकांनी सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना फोन करून पोलिस ताफा बोलावला. निरीक्षक अकबर पटेल, मुख्यालयाचे पोलिस कर्मचारी असा फौजफाटा कारागृहात दाखल झाल्यावर हा प्रकार थांबला. दरम्यान, या सर्व १० कैद्यांना जालना येथील जेलमध्ये हलविण्यात आले आहे.