नोटांवर गांधींऐवजी मोदींचा फोटो छापा : कॉंग्रेस आमदाराची अजब मागणी !

जयपूर वृत्तसंस्था | रिझर्व्ह बँकेने पाचशे आणि दोन हजार रूपयांच्या नोटांवरून महात्मा गांधी यांचा फोटो हटवून त्या ऐवजी पंतप्रधान मोदी यांचा फोटो छापावा अशी मागणी राजस्थानातील कॉंग्रेसचे आमदार भरतसिंह कुंदनपूर यांनी केली आहे.

राजस्थानमधील कॉंग्रेसचे आमदार भरत सिंह कुंदनपूर यांनी मोदींना पत्र लिहले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांवर छापलेले गांधीजींचे चित्र हटवण्यात यावे, अशी माझी मागणी आहे. कारण या नोटांचा वापर भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले लोक लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे गांधीजींचा अपमान होतो. दरम्यान, ५०० आणि २००० हजार रुपयांच्या नोटांवर मोदींनी स्वत:चा फोटो लावावा, आणि त्याखाली न खाऊंगा, न खाने दुंगा हा संदेश लिहावा, असा सल्लाही भरत सिंह कुंदनपूर यांनी या पत्रातून दिला. ते म्हणाले की, असे केल्याने भ्रष्टाचार थांबेल. भ्रष्टाचारी नोटा घ्यायला घाबरतील. भ्रष्टाचार्‍यांमध्ये मोदींनी दिलेल्या इशार्‍याची भीती असेल. ते चमकतील. कारण मोदींना नोटाबंदीचा पुरेपूर अभ्यास आहे.

या पत्रात पुढे म्हटले आहे की, गेल्या साडेसात दशकांमध्ये देश आणि समाजात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी एसीबी विभाग आहे. तो आपले काम करत आहे. राजस्थानमध्ये जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०२० या काळात ६१६ ट्रॅप पकडण्यात आले. म्हणजेच राज्यात दररोज सरासरी दोन ट्रॅप लावण्यात आले. ही रक्कम रोख स्वरूपात घेतली जाते. यासाठी ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा वापरल्या जातात. त्यावर गांधीजींचं चित्र असतं. त्यामुळे गांधीजींचा अपमान होतो. त्यामुळे गांधीचींचा फोटो हा ५, १०, २०, ५०, १०० आणि २०० रुपयांच्या नोटांवर छापला जावा. या नोटा गरीबांना उपयोगी पडतात. तसेच गांधीजींनीही गरिबांसाठी काम केले होते, असे त्यांनी सांगितले.

 

Protected Content