नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज देश आपला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर पंतप्रधान मोदी देशवासीयांना संबोधित केले. सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतल्यानंतर त्यांनी देशाला केलेले हे सलग 11वे संबोधन आहे. आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी सांगितले की, 2047 विकसित भारत हा केवळ शब्द नसून 140 कोटी देशवासियांचे स्वप्न आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या वैद्यकीय क्षेत्राला आणखी बळकट करण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी पुढील 5 वर्षात 75,000 नवीन वैद्यकीय जागा वाढवणार असल्याची घोषणा केली. पीएम मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, ‘विद्यार्थी परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी लाखो-कोटी रुपये खर्च करतात. सुमारे 25 हजार तरुण परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी विविध देशांमध्ये जातात. या विद्यार्थ्यांसाठी येत्या पाच वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात 75 हजार नवीन जागा निर्माण करण्यात येतील. गेल्या 10 वर्षात आम्ही मेडिकलच्या जागा जवळपास 1 लाखांपर्यंत वाढवल्या आहेत.’
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. यावेळी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंनाही स्वातंत्र्य दिनानिमित्त पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पीएम मोदींनी सुमारे 97 मिनिटे भाषण केले. स्वातंत्र्यानिमित्त पंतप्रधानांचे हे सर्वात मोठे भाषण आहे. 1947 मध्ये तत्कालीन पंतप्रधानांनी 72 मिनिटे भाषण केले होते. स्वातंत्र्यदिनी 97 मिनिटांचे भाषण करून नरेंद्र मोदींनी आपलाच विक्रम मोडला आहे. त्यांनी 2016 मध्ये 94 मिनिटांचे भाषण करून एक विक्रम केला होता.
मोदींनी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या भाषणात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना मागे टाकले आहे. मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 दरम्यान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून 10 वेळा तिरंगा फडकवला होता. या बाबतीत मोदी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. नेहरूंना 17 वेळा तर इंदिरा गांधींना 16 वेळा हा सन्मान मिळाला होता.