नवी दिल्ली वृत्तसंस्था । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान भारतमातेशी खोटं बोलतात, अशा शब्दात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. आसाममध्ये गोलपाडा येथे सर्वात मोठी स्थानबद्धता छावणी (डिटेंशन सेंटर) निर्माण केली जात असून यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत खोटं बोलत असल्याचा आरोप केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत बोलताना कुठेही स्थानबद्धता छावणी उभारली जात नसून काँग्रेस करत असलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला होता. राहुल गांधी यांनी बीबीसीने स्थानबद्धता छावणीसंबंधी केलेला रिपोर्ट शेअर करत मोदींवर टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) पंतप्रधान भारतमातेशी खोटं बोलत आहेत अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत (एनआरसी) संसद, मंत्रिमंडळात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे रविवारी दिल्ली येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले होते. मात्र प्रत्यक्षात आसाम येथील गोलपाडा येथे सर्वात मोठी स्थानबद्धता छावणी निर्माण केली जात असून राज्यातही नवी मुंबईतील नेरुळ येथे एनआरसी कायद्याच्या अंमलबजावणीनंतर स्थानबद्धता छावण्या उभारण्याच्या हालचाली गोपनीय पद्धतीने सुरू असल्याचे समोर आले आहे. आसाममधील स्थानबद्धता छावणीत जवळपास तीन हजार जणांना ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.