अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अमळनेरची कन्या राजनंदनी यादव हिने संवाद साधत तिच्यातील कौशल्याची चुणूक दाखविली.
२६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनी दिल्ली, राजपथ येथे होणाऱ्या परेडसाठी देशभरातील राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) चे निवडक विद्यार्थी एकत्र जमले आहेत. यात अमळनेरची राजनंदनी यादव या विद्यार्थीनीचीदेखील निवड झाली आहे.
२५ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास या देशभरातील विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधत प्रत्येक भागाचे महत्त्व जाणून घेतले. त्यात राजनंदनी यादव हिच्याशी संवाद साधत तुला या कार्यक्रमातून काय शिकवण मिळाली असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी विचारल्यावर देशातील विविधतेतून एकतेचा संदेश शिकायला मिळाला, असे राजनंदनीने उत्तर दिले.
शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने स्वराज्य निर्माण केले, त्यांच्यानंतर जर कोणी असेल तर ते नरेंद्र मोदी होय, असेही गौरवोद्गार राजनंदनीने काढले. राजनंदनी प्रताप महाविद्यालयातील एफवायबीएस्सीची विद्यार्थीनी असून तिचे वडील राजेंद्र श्याम यादव (अण्णा मेजर) हे सेवानिवृत्त आर्मी सैनिक आहेत तर आई शितल राजेंद्र यादव ह्या माजी नगरसेविका आहेत.