Home Cities जळगाव राजपूत समाजाचा गौरव सोहळा; विद्यार्थ्यांसह समाजातील मान्यवरांचा सत्कार

राजपूत समाजाचा गौरव सोहळा; विद्यार्थ्यांसह समाजातील मान्यवरांचा सत्कार

0
106

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मुक्तांगण सभागृहात गुरुवारी, २५ डिसेंबर रोजी सकाळी राजपूत समाजाच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जनसेवा सामाजिक विकास संस्था आणि समस्त राजपूत समाज बहुउद्देशीय सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सन २०२६ च्या नवीन दिनदर्शिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

गुणवत्तेचा सन्मान आणि प्रेरणेची थाप
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. हेमकांत धाडी होते. समाजातील ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे, अशा विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. “विद्यार्थ्यांचे हे यश समाजासाठी अभिमानास्पद असून, त्यांच्या पुढील वाटचालीस बळ मिळावे हाच या सत्कार सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

दिनदर्शिका २०२६ चे विमोचन
या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे आगामी २०२६ सालासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष दिनदर्शिकेचे अनावरण. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन आणि वरणगाव नगरपरिषदेच्या नगरसेविका तृप्ता महाजन उपस्थित होत्या. या दिनदर्शिकेच्या माध्यमातून समाजातील सांस्कृतिक आणि सामाजिक माहिती घराघरांत पोहोचवण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी समाजाचे अध्यक्ष किशोर महाजन, सहसचिव रवी पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि राजपूत समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून समाज संघटन आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound