नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशभरात प्रखर विरोध होत असतांनाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तिन्ही कृषी विधेयकांवर स्वाक्षरी केली आहे. यामुळे या विधेयकांचे आता कायद्यात रूपांतर झाले आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळालेल्या तीन कृषी विधेयकांविरोधात देशभरात शेतकर्यांची आंदोलने सुरु असतानाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकांना आपल्या सहीसह मान्यता दिली आहे. त्यामुळे आता या तिन्ही विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाले आहे.
नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ही तीनही विधेयकं संमत करण्यात आली. ही विधेयके लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाली. मात्र, ही विधेयक शेतकर्यांच्या हिताच्याविरोधात असल्याचा दावा विविध शेतकऱी संघटनांनी करून याच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू करण्यात आली आहेत.
दरम्यान, भाजापाने या सर्व परिस्थितीवरुन आरोप करताना विरोधकांकडून शेतकर्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला. तसेच या विधेयकांमुळं शेतकर्यांच्या जीवनात बदल होईल असा दावा केला. तर आज सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकांवर स्वाक्षरी केली असून त्यांचे आता कायद्यात रूपांतर झाले आहे.