जिल्ह्यात 85 मतदान केंद्र वाढीचा प्रस्ताव आयोगाला सादर – जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी

election

election

जळगाव (प्रतिनिधी)। लोकसभा निवडणूकीत मतदारांच्या सोयीसाठी जिल्ह्यात 85 सहाय्यकारी मतदान केंद्र वाढीचा प्रस्ताव आयोगाला पाठविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. विधानसभा मतदार संघ निहाय सहाय्यकारी मतदान केंद्र, मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल आणि मतदान केंद्रांच्या नावात बदलाबाबतची माहिती देण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांचेसह विविध राजकिय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मतदानाच्या दिवशी मतदाराला मतदानासाठी दोन किलोमीटरपेक्षा अधिक अंतर जावे लागू नये. तसेच ग्रामीण भागातील ज्या मतदान केंद्रावर 1200 पेक्षा अधिक तर शहरी भागात 1400 पेक्षा अधिक मतदार असतील. अशाठिकाणी सहाय्यकारी मतदान केंद्र वाढीचा प्रस्ताव आयोगाला पाठविण्यात येत असल्याची माहिती डॉ. ढाकणे यांनी उपस्थितांना दिली. त्यानुसार जिल्ह्यात 85 सहाय्यकारी मतदान केंद्र वाढीचा प्रस्ताव आहे. वाढीप मतदान केंद्रामुळे आता जिल्ह्यातील मतदान केंद्राची एकूण संख्या 3617 इतकी होणार असून यापूर्वी ही संख्या 3532 इतकी होती. सर्वाधिक 28 मतदान केंद्र वाढीचा प्रस्ताव हा जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी आहे. त्यानंतर रावेर 11, जळगाव ग्रामीण 9, भुसावळ व पाचोरा प्रत्येकी 8, जामनेर 7, अमळनेर 6, मुक्ताईनगर व चोपडा प्रत्येकी 3 तर चाळीसगाव विधानसभा मतदार संघात 2 मतदान केंद्र वाढीचा प्रस्ताव असल्याचेही डॉ. ढाकणे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मतदान केंद्रांची इमारत अथवा खोली बदलल्यामुळे जिल्ह्यातील 60 मतदान केंद्रांच्या ठिकाणात तर 99 मतदान केंद्रांच्या नावात बदल करण्याचेही प्रस्तावित असल्याचे डॉ. ढाकणे यांनी बैठकीत सांगितले.

अशी मतदान केंद्रे
मतदान केंद्र वाढीच्या प्रस्तावामुळे जिल्ह्यात आता 3532 ऐवजी 3617 मतदान केंद्र होणार आहे. विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्राची संख्या पुढीलप्रमाणे. जळगाव शहर – 393, रावेर – 319, जळगाव ग्रामीण – 336, भुसावळ – 315, पाचोरा – 330, जामनेर – 328, अमळनेर- 323, मुक्ताईनगर व चोपडा प्रत्येकी- 321, चाळीसगाव – 341 तर एरंडोल – 290 इतकी होणार आहे.

Add Comment

Protected Content