जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दहा दिवसांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि घरांमध्ये विराजमान झालेल्या गणरायाला शनिवारी ६ सप्टेंबर रोजी भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. या निमित्ताने जळगावातील प्रमुख विसर्जन स्थळ असलेल्या मेहरुण तलावाच्या गणेश घाटावर प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस, मनपा आणि सार्वजनिक गणेश मंडळे यांच्यात योग्य समन्वय साधला जात आहे. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत…
मेहरुण तलावावर विशेष व्यवस्था
मेहरुण तलावावरील गणेश घाटावर भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी बांबूचे बॅरिकेडिंग करण्यात आले आहे, तसेच तराफ्यांची सोयही करण्यात आली आहे. गणेश घाटाच्या शेजारी पोलीस विभागाने दोन वॉच टॉवर उभारले आहेत. या टॉवरवरून पोलीस कर्मचारी गर्दीवर नियंत्रण ठेवतील आणि कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी सतत लक्ष ठेवतील.

स्वच्छतेसाठी निर्माल्य कलश
विसर्जन सोहळ्यादरम्यान स्वच्छतेचे भान राखणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेतर्फे गणेश घाटावर ठिकठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी आपले निर्माल्य याच कलशांमध्ये टाकावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच, विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर पावसामुळे तयार झालेले खड्डे बुजवण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे, जेणेकरून मिरवणुकीत कोणताही अडथळा येणार नाही.
शांततेत विसर्जन करण्याचे आवाहन
गणपती विसर्जन मिरवणुका वेळेवर सुरू व्हाव्यात आणि शांततेत पार पडाव्यात यासाठी पोलीस प्रशासन, महापालिका आणि सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते दिवस-रात्र परिश्रम घेत आहेत. सर्व गणेश मंडळांनी पोलिसांना सहकार्य करून शांततेचे वातावरण कायम ठेवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोणत्याही अनुचित प्रकाराला वाव न देता गणरायाला भक्तीभावाने निरोप देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.



