मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लिव्ह ईन संबंधांमध्ये एका महिलेवर बलात्कार करण्याचा आरोप असणारे भाजपचे आमदार गणेश नाईक यांना उच्च न्यायालयाने दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने लैंगिक अत्याचाराचे आऱोप केले होते. ’’गणेश नाईक यांनी माझ्यावर गेल्या अनेक वर्षांपासून लैंगिक अत्याचार केला. माझ्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला भाग पाडले. त्यामधून आम्हाला एक मुलगा देखील झाला. त्यानंतर आता गणेश नाईक मुलाला स्विकारण्यास नकार देत आहेत. ते आणि त्यांचा मुलगा मला आणि माझ्या मुलाला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी,’’ असे आरोप महिलेने केले होते. त्यानंतर राज्य महिला आयोगाने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. या अनुषंगाने गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर गणेश नाईक यांना अटक होण्याची शक्यता होती. यातच सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर गणेश नाईकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुनावणी होऊन आज मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. यामुळे गणेश नाईक यांना दिलासा मिळाला आहे.