जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३-क मधील राजकीय वातावरण तापू लागले असून, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रवीण रामदास कोल्हे यांनी आज जोरदार प्रचाररॅली काढत आपली ताकद दाखवून दिली. धनुष्यबाण ही अधिकृत निवडणूक निशाणी असलेल्या या रॅलीला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आज १० जानेवारी रोजी सकाळी महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्यापासून या प्रचाररॅलीची सुरुवात झाली. त्यानंतर रॅली तानाजी मालुसरे नगर, जुना खेडी रोड, डीएनसी कॉलेज परिसर, योगेश्वर नगर, तळेले कॉलनी आणि ज्ञानदेव नगर या भागातून मार्गक्रमण करत पुढे गेली. विविध भागांतून रॅली जात असताना नागरिकांनी उमेदवाराचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.

प्रचाररॅलीदरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या घोषणा देत वातावरण उत्साही केले होते. प्रवीण कोल्हे यांनी रॅलीदरम्यान नागरिकांशी संवाद साधत प्रभागाच्या विकासासाठी आपली भूमिका मांडली. मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरी समस्यांवर प्राधान्याने काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या रॅलीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. धनुष्यबाण निशाणीच्या माध्यमातून प्रभागात विकासाभिमुख राजकारण करण्याचा निर्धार कोल्हे यांनी व्यक्त केला. प्रचाराच्या सुरुवातीलाच झालेल्या या शक्तिप्रदर्शनामुळे प्रभाग ३-क मधील निवडणूक लढत अधिक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
रॅलीचा समारोप ज्ञानदेव नगर परिसरात शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने झाला. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत प्रवीण कोल्हे यांनी विश्वास व्यक्त केला की, मतदारांचा पाठिंबा मिळाल्यास प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम केले जाईल.



