जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेने आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध करत हॅट्रिक साधली आहे. प्रभाग क्रमांक 9 ‘ब’मधून शिवसेनेच्या प्रतिभा गजाजन देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्याने शहराच्या राजकारणात शिवसेनेची चर्चा रंगली आहे.

जळगाव महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत बिनविरोध उमेदवारांच्या शर्यतीत शिवसेनेने आघाडी घेतली आहे. छाननी प्रक्रियेत भाजपच्या उज्वला बेंडाळे बिनविरोध झाल्यानंतर अर्ज माघारीच्या टप्प्यात शिवसेनेने सलग तीन प्रभागांत बिनविरोध उमेदवार निवडून आणत राजकीय वर्तुळात लक्ष वेधून घेतले आहे. या घडामोडींमुळे महापालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेनेचे पारडे जड मानले जात आहे.

आज प्रभाग क्रमांक 18-अ मधून शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव गौरव सोनवणे, तसेच प्रभाग क्रमांक 9 ‘अ’ मधून मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. या यशानंतर आता प्रभाग क्रमांक 9 ‘ब’मधून प्रतिभा देशमुख यांच्या बिनविरोध निवडीने शिवसेनेने हॅट्रिक पूर्ण केली आहे.
प्रभाग 9 ‘ब’मध्ये त्यांच्या विरोधात माजी नगरसेविका प्रतिभा पाटील या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात होत्या. मात्र, त्यांनी अर्ज माघारी घेतल्याने प्रतिभा देशमुख यांचा विजय निर्विवाद ठरला. या बिनविरोध निवडीमुळे प्रभागातील राजकीय समीकरणे स्पष्ट झाली असून शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीचे दर्शन घडले आहे.
प्रतिभा देशमुख या दुसऱ्यांदा जळगाव महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून प्रवेश करणार आहेत. याआधी त्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रभागातील विविध विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. रस्ते, नागरी सुविधा आणि स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न मतदारांमध्ये सकारात्मक ठरल्याचे बोलले जात आहे.
त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी निवडणूक टप्प्यांमध्ये पक्ष अधिक आक्रमकपणे मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जळगाव महापालिकेच्या राजकारणात शिवसेनेने मिळवलेले हे यश आगामी सत्तासमीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.



