Home धर्म-समाज मराठा सेवा संघाच्या पारोळा शहराध्यक्षपदी प्रतीक मराठे यांची बिनविरोध निवड

मराठा सेवा संघाच्या पारोळा शहराध्यक्षपदी प्रतीक मराठे यांची बिनविरोध निवड


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील मराठा सेवा संघाच्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. डॉ. शांताराम पाटील (तालुकाध्यक्ष, मराठा सेवा संघ) यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये प्रतीक मराठे यांची शहराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाची नव्याने घडी बसविण्यात आली असून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या निवड प्रक्रियेत सचिवपदी सतिश माने, उपाध्यक्षपदी प्रभाकर पाटील तर कार्याध्यक्षपदी संदीप बळीराम पाटील यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. ही संपूर्ण कार्यकारिणी समाजहितासाठी कार्यरत राहील आणि संघाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध कार्यक्रमांची आखणी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमावेळी तालुका मराठा सेवा संघाचे सचिव प्रा. जे. बी. पाटील, उपाध्यक्ष रवि पाटील, डॉ. योगेंद्र पवार, देविदास सोनवणे, निलेश पाटील, मनोहर पाटील यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते. या वेळी नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीला शुभेच्छा देताना पुढील वाटचालीसाठी पाठबळ देण्याचे आश्वासनही देण्यात आले.

कार्यक्रमात एक विशेष उल्लेखनीय क्षण म्हणजे उपाध्यक्ष रवि पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासाठी ‘प्रवक्ता अकॅडमी’ची स्थापना केली. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल संघाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतील, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

संपूर्ण निवड प्रक्रिया सुसंघटित व पारदर्शक पद्धतीने पार पडली. कार्यकारिणीने एकमताने संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी एकजूट दाखवत कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे जळगाव जिल्हा व पारोळा तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.


Protected Content

Play sound